महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसंदर्भात भाष्य करताना लोकमान्य टीळकांचा उल्लेख करत केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय. पिंपरीमध्ये आज कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि राज यांच्या भाषणातील इतर मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज काय म्हणाले होते?
या सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडताना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य-टिळकांनी बांधली, मग टिळकांनाही तुम्ही ब्राह्मण म्हणूनच बघणार का?, असा सवाल केला होता. याच वक्तव्यावरुन आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली
“छत्रपत्री शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी आराध्यदैवत आहेत. त्यांच्या समाधीविषयी राज जे बोलले, त्यावरून त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आल्याचे दिसते. अनेक इतिहास संशोधकांनी याबाबतचे पुरावे समोर आणले आहेत. महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली. त्यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला. शिवजयंती त्यांनीच सुरू केली,” असं अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंनी केलेला दावा खोडून काढताना म्हटलंय.

तेव्हा जमा झालेले ८० हजार…
“समाधीच्या जीर्णोध्दाराचा विचार पुढे आला त्यावेळेस शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, त्यामुळे त्यांच्या समाधीसाठी रयतेने पैसा उभारावा, असा मुद्दा लोकमान्य टिळकांनी मांडला. त्यानुसार, निधी उभारण्यात आला. परंतु तत्कालिन डेक्कन बँक दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे तेव्हा जमा झालेले ८० हजार रूपयेही बुडाले,” असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

एकमेकांची डोके फोडणे यापेक्षा…
“१९२० साली टिळकांचे निधन झाले. पुढे, १९२७ साली ब्रिटीश सरकारने महाराजांची समाधी बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. इतिहास शुध्द तर्काच्या आधारे मांडायचा असतो. तो मांडताना द्वेष निर्माण होऊ नये तथा धार्मिक भावना भडकता कामा नये. इतिहासाच्या ज्वाज्वल्य प्रेरणेचा वापर राष्ट्रनिर्माणासाठी झाला पाहिजे. केवळ इतिहासाचे दाखले देऊन एकमेकांना भडकावणे, एकमेकांची डोके फोडणे यापेक्षा रयतेचे कल्याण अधिक महत्त्वाचे आहे,” असे कोल्हे म्हणाले.

देशहिताच्या गोष्टींवर भाष्य करायला हवे होते
“जातीपातीचे, धर्माचे मुद्दे पुढे काढून देशासमोरील महागाई, बेरोजगारी, कोळसा टंचाई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद आणि तथ्यहीन आहे. वास्तविक राज यांनी वादग्रस्त विषय काढण्याऐवजी महाराष्ट्राच्या व देशहिताच्या गोष्टींवर भाष्य करायला हवे होते,” असंही कोल्हेंनी म्हटलंय.

पवारांविषयी चुकीचा प्रचार
“पवारांवर बोलले की प्रसिध्दी मिळते. देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मोट बांधण्याची क्षमता पवारांमध्ये आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी अनेकांना धास्ती वाटते, अशांनीच पवारांविषयी चुकीचा प्रचार चालवला आहे,” अशी टीकाही कोल्हेंनी केलीय.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe on raj thackeray claim saying chatrapati shivaji maharaj samadhi was build by lokmanya tilak scsg