पुणे : ‘आध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो. येथे आणखी काय सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते आणि ते देखील पुण्याकडे विशेष लक्ष देतात,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी रविवारी केले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने अमृता फडणवीस यांच्या हस्ते ओबेसिटी तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, विरूपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणाऱ्या वज्रलेपनकार स्वाती ओतारी आणि अनाथ नवजात शिशूंना कायदेशीरपणे दत्तक देण्याचे काम करणाऱ्या महिला सेवा मंडळ या संस्थेला लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महिला सेवा मंडळ संस्थेच्या विश्वस्त पुष्पा हेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी फडणवीस बोलत होत्या. राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्या डॉ. निवेदिता एकबोटे, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड्. शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त ॲड्. रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, महेंद्र पिसाळ, अक्षय हलवाई, ॲड्. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाल्या, ‘दत्त मंदिर समाजाच्या सेवेसाठी अग्रेसर आहे, याचा आनंद आहे. खरी मानवता काय आहे, हे विश्वस्तांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा, यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पाठीमागे लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांचा हातभार होता. लक्ष्मीबाई या शांतपणे परिवर्तन घडवून आणत. त्यांच्यामध्ये लोकांप्रती संवेदना होती. त्यांच्यासारखे कार्य या तिन्ही पुरस्कारार्थींचे आहे. आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा झाला, तरच जीवन समृद्ध होते.’
ॲड्. शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, ‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराला १२८ वर्षांचा भक्तिमय आणि आध्यात्मिक वारसा आहे. मंदिराच्या संस्थापक लक्ष्मीबाई दगडूशेठ यांच्या कार्याची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.’ एकबोटे, हेगडे, तोडकर आणि ओतारी यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड्. परदेशी यांनी स्वागत केले. गाडवे यांनी आभार मानले. डॉ. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.