लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : गैरव्यवहार प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याकडून तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक संजय गुंजाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. संगमवाडी परिसरात शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. निलंबित कर्मचाऱ्याकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना गुंजाळ यांना ताब्याात घेण्यात आले.

याप्रकरणी कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक, प्रभारी सहसंचालक संजय बहादू गुंजाळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये येरवडा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कृषी आयुक्तालयातील निलंबित कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. तक्रारदार २०१९-२०२० मध्ये जळगाव जामोद बुलढाणा येथे कनिष्ठ लिपिक होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत गैरव्यवहार, तसेच कसुरी केल्याचा ठपका ठेवून अमरावतीतील कृषी सहसंचालकांनी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. याप्रकरणाची चौकशी सुरू होते. निलंबन कालावधीत मदत करणे, तसेच तक्रारदाराविरुद्ध घेण्यात आलेल्या आक्षेपांविरुद्ध मदत करण्यासाठी गुंजाळ यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीत अडीच लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली.

आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र

या तक्रारीची पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर सापळा लावण्यात आला. शुक्रवारी रात्री तक्रारदाराला अडीच लाख रुपये घेऊन संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आरामबस थांब्यावर बोलाविण्या आले. तक्रारदाराकडून लाच घेताना गुंजाळ यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अलाा. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti corruption bureau arrests bribe taking deputy director of agriculture commissionerate pune print news rbk 25 mrj