लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’च्या रूपाने उभ्या केलेल्या नाट्यशिल्पाला तोड नाही. या नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज देऊन या नाटकाशी आपण जोडले गेलो. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने बाबासाहेबांना मी आपल्या घरात घेऊन जातो आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी रविवारी व्यक्त केली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची शिफारस; सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

या वेळी सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी जाणता राजा महानाट्याशी असलेला आपला संबंध उलगडून दाखवला. ते म्हणाले, की बाबासाहेब पुरंदरे यांनी महानाट्यातील छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज मी द्यावा, असा निरोप त्यांनी दिला होता. मी एवढ्या मोठ्या व्यक्तीला आवाज देण्याबाबत मी सांशक होतो. तेवढी माझी कुवत आणि लायकीही नव्हती. त्यामुळे मी त्यांना नकार कळविला. परंतु, या महानाट्याशी संबंध जोडला जावा, यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांचा आवाज मी दिला. आजही अनेकांना तो आवाज माझा असल्याचे माहिती नाही. कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारे प्रेक्षकांचे पाठबळ महत्वाचे आहे, याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असे पाठबळ कायम महाराष्ट्राच्या रसिकांनी दिले, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा-“डॉ. दाभोलकरांच्या खुनाला १० वर्षे होऊनही मारेकरी मोकाट का?”; महाराष्ट्र अंनिसचा सरकारला सवाल

अशोक सराफ यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे, असे नमूद करून पालकमंत्री पाटील म्हणाले, अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांची नाटके हमखास यशस्वी ठरायची. त्यांचे अनेक चित्रपट, नाटके यशस्वी ठरले. आज कर्तृत्व आणि नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही, असे सुंदर मिश्रण अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात जाणवते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसे चांगले काम करीत असल्याची खात्री पटते.

या वेळी भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज-व्यक्तिमत्वाचे भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसन्न परांजपे यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf has given voice for baji prabhu deshpande in jaanta raja pune print news stj 05 mrj