“खुनाला १० वर्षे होऊनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १० वर्षे सतत केलेल्या आंदोलन उपक्रमामुळे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची विचारधारा, संघटना आणि त्यांचे पाठीराखे कोण आहेत याची जाणीव सर्व जगाला झाली आहे, असं मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी केली. ते रविवारी (२० ऑगस्ट) पुण्यातील एस एम जोशी सभागृह येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विवेक निर्धार मेळाव्यात बोलत होते. यावेळी अविनाश पाटलांसह ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, रझिया पटेल, महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बागवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अविनाश पाटील म्हणाले, “इतिहासात राजा किंवा नेता मारला गेला की राज्य, पक्ष किंवा संघटना संपून जाते. परंतु, महा. अंनिसच्या बाबतीत तसे घडले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खूनाला १० वर्षे होऊनही संघटनेचे काम थांबले नाही. संघटना ताकदीने उभी राहिली. या सारखे देशात मागील ५० वर्षांच्या काळात दुसरे उदाहरण नाही.”

Uddhav Thackeray
“महाराष्ट्रात गद्दारांचे दोन मालक..”, उद्धव ठाकरेंची मोदी-अमित शाह यांच्यावर बोईसरच्या सभेत टीका
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
ashok chavan raj thackeray
राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

“कुठलाही धर्म धोक्यात नसतो, काही लोकांची सत्ता धोक्यात असते”

डॉ. पुनियानी म्हणाले, “कुठलाही धर्म धोक्यात नसतो, तर काही लोकांची सत्ता धोक्यात असते. हे लोक ही सत्ता धर्माच्या आधारे मिळवतात. स्वातंत्र्य लढ्यात फुले, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टी असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्य आपल्याला दिली. याच्या विरोधात दुसऱ्या बाजूला धर्म, द्वेष आणि विषमतेवर आधारित मूल्यांचा प्रसार करण्यात आला. डॉ. दाभोलकरांचा खून अशी द्वेष आणि विषमतेची मूल्ये जपणाऱ्या विचारसरणीतून करण्यात आला’.

Dr Ram Puniyani Maharashtra ANNIS
महाराष्ट्र अंनिसचा सरकारला सवाल

“सत्य आणि अहिंसा रुजविण्यासाठी १०० दाभोलकरांची गरज”

हेमंत देसाई म्हणाले, “देशात धर्म आणि राजकारण यांची युती झाली आहे. यातून धर्मवादास पाठबळ दिले जात आहे. सरकारे केवळ सण साजरे करण्यासाठी स्थापन झाली आहेत का? सत्य आणि अहिंसा ही कचऱ्यात टाकलेली मूल्य बनली आहेत. ती रुजविण्यासाठी १०० दाभोलकरांची गरज आहे.”

हेही वाचा : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश…”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल विमल यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या कामांचे निर्धार व्यक्त केले. विजय नांगरे, अनिल करवीर, भास्कर सदाकळे, निर्मला माने, अमोल वाघमारे, प्रतीक जाधव, केशव कुदळे यांनी गाणी सादर केली. घनश्याम येणगे यांनी आभार मानले.

मूक मोर्चातून सरकारबद्दल असंतोष, डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन

दरम्यान, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी ठिकठिकाणी मुकमोर्चातून आपला असंतोष व्यक्त केला. ‘दहा वर्षे खुनाची – कार्यरत विवेकी असंतोषाची’, ‘माणूस मारता येतो-विचार नाही’, ‘बेपर्वा सरकार -धिक्कार धिक्कार’ असे फलक झळकवत कार्यकर्त्यानी आपली भावना व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या १० वर्षानंतरही आरोपींवर कारवाई होऊ न शकल्याने कार्यकर्त्यांनी मोर्चामध्ये सरकार आणि तपास यंत्रणेच्या धिक्कारचे पोस्टर हातात घेऊन संदेश दिला.

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकरांचा गोळ्या घालून खून करण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूलापासून एस. एम. जोशी सभागृहापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. त्याअगोदर पुलावर स्मृतिजागर झाला. यावेळी गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, माधव बावगे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे आणि विविध संस्था संघटनांचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : “डॉ. दाभोलकरांचा खून होऊन ३ हजार ५०० दिवस झाले, केंद्र-राज्य…”; अंनिसचं पुण्यात अभिवादन

“डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केला हे सर्वांना माहित आहे. तरीही सनातन संस्थेचे अध्यक्ष जयंत आठवले यांना अटक का केली जात नाही. ज्यांना अटक केले होते ते जामीनावर बाहेर मोकाट फिरत आहेत. तपास यंत्रणाकडून संदिग्धता का ठेवली जाते,” असा प्रश्न अविनाश पाटील यांनी उपस्थित केला. गाणी, घोषणा, घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्वेषाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनायक सावळे यांनी केले. समारोप विशाल विमल यांनी केला.