पिंपरी : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जानेवारी महिन्यात होत आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहरातील ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरून जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यांचे डांबरीकरण करून ते चकाचक करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दुभाजक आणि चौक सुशोभित करण्यात येत आहेत.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई सायकलिंग महासंघ, आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच होत आहे. स्पर्धा चार टप्प्यात ४३७ किलोमीटर अंतरावर होणार आहे. त्यातील पहिल्या आणि चौथ्या टप्प्यातील स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहरातील ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर होणार आहे. स्पर्धा होणाऱ्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार महापालिकेच्या शहरी दळणवळण, स्थापत्य विभागाकडून आवश्यक ती कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महापालिकेने सल्लागार संस्थेची निवड केली आहे.
रस्त्याचे डांबरीकरण
महापालिका शहरातील स्पर्धा मार्गावरील रस्ते दुरुस्त करून डांबरीकरण करणार आहे. मार्गावरील गतिरोधक काढण्यात येणार आहेत. लेन मार्किंग करून अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार काम केले जाणार आहे. रस्त्यावरील दुभाजक, विद्युत प्रकाश खांब, बीआरटीचे सुरक्षा कठडे, पुलाची रंगरंगोटी केली जाणार आहे. रस्ते व चौकांमध्ये सुशोभिकरण करण्यात येणार आहे. रोषणाईसाठी विद्युत कामे केली जाणार आहेत. रस्त्याच्या कडेचे गटार तसेच रेलिंगची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
असा आहे शहरातील मार्ग
औंध येथील राजीव गांधी पूल ते किवळे रस्ता, निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प चौक, एमआयडीसी, सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते काळेवाडी फाटा या मार्गावरून स्पर्धा जाणार आहे. विनोदे वस्ती चौक ते भूमकर चौक, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, स्पाईन रस्ता, भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक अशी शहरातील ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांवर ही स्पर्धा होणार आहे.
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही सायकल स्पर्धा शहरात जानेवारी महिन्यात होत आहे. मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण, रस्ते आणि चौक सुशोभित करण्यात येत आहेत. रस्त्यावरील उंचवटे व गतिरोधक काढून टाकण्यात येणार आहेत. प्रकाश दिव्यांचे काम, कठडे, दुभाजक यांची आकर्षक पद्धतीने रंगरंगोटी केली जाणार आहे. आवश्यक ठिकाणी ‘लॅण्डस्केपिंंग’ केले जाणार असल्याचे शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले..
