पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे सायंकाळी घडली. भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शहरात रोड शो सुरू असतानाच ही घटना घडली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा शहरप्रमुख सचिन भोसले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेरगाव परिसरात घरोघरी जात प्रचार करत होते. प्रचारादरम्यान सायंकाळी काहीजण तेथे आले. त्यांनी भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ता गोरख पाषणकर याचा पाय मोडला असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – येरवड्यातील बालसुधारगृहातून पसार झालेल्या अल्पवयीन मुलाला पकडले

हेही वाचा – पुणे : रिपब्लिकन सेनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा, ‘वंचित’चे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला आणि नेमका कशासाठी केला हे अद्याप समोर आले नाही.

आम्ही प्रचार करत होतो, आम्हाला थेट येऊन मारहाण केली – भोसले

चार ते पाच जणांनी हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत. ज्याने मारहाण केली तो गुंड आहे. आज सुदैवाने बचवलो. वरिष्ठ नेत्यांना याबाबत कळवले आहे. आम्ही प्रचार करत होतो, आम्हाला थेट येऊन मारहाण केली. वैयक्तिक माझे वाद नाहीत. यापूर्वी माझ्या विरोधात भाजपाचा उमेदवार लढला होता, हे त्यांचे कार्यकर्ते आहेत. नियोजन करून मला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून हल्ला केला, असे सचिन भोसले म्हणाले.