बारामती: बारामती तालुक्यातील जळोची एमआयडीसी येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे अटक केली आहे.

जयेश माने आणि प्रथमेश गवळी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास फिर्यादी जळोची येथील पान शॉपवर थांबला असताना माने, गवळी आणि त्याचे साथीदार मोटारसायकलवरून आले. त्यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी पसार झाले.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली.

बारामती तालुक्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती</strong>