पुणे : भारतात अत्याधुनिक ‘अल्ट्रा ड्रोन’ सादर करण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेडने (बीएफएल) ब्रिटनमधील विंडरेसर्स कंपनीशी परस्पर सामंजस्य करार केला आहे. ही अल्ट्रा ड्रोन जड भार वाहू शकणारी आणि दुहेरी वापरण्यायोग्य अत्याधुनिक स्वरूपाची आहेत. त्यांचा वापर भविष्यात भारतीय संरक्षण दलासाठी होऊ शकणार आहे.

विंडरेसर्स कंपनीकडून विंडरेसर्स अल्ट्रा या ड्रोनची (यूएव्ही) निर्मिती केली जाते. आता ही ड्रोन भारतात सादर करण्यात येणार आहेत. या ड्रोनसाठी कार्यक्षेत्र निश्चित करणे, स्थानिक दृष्टिकोनातून त्यात बदल करणे आणि त्यांचा प्रत्यक्षात वापर यासाठी हा करार करण्यात आला. लंडन येथे झालेल्या ‘डीएसईआय यूके २०२५’ या प्रदर्शनात या करारावर शिक्कामोर्तब झाले. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारान्वये दोन्ही देशांमध्ये एअरोस्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान हस्तांतर व नावीन्य वाढविण्याच्या हेतूने ही भागीदारी करण्यात आली आहे.

भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांच्यातील करार दोन वर्षांच्या कालावधीसाठीचा असून, त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर ड्रोनचा वापर वाढविणे, संयुक्त चाचण्या घेणे आणि त्यांची भारतातील प्रत्यक्ष तैनातीसाठी अंतिम रूपरेषा तयार करण्याचे काम या भागीदारीतून होईल. ‘अल्ट्रा’ ड्रोनच्या क्षमतांचा वापर करून भारताच्या संरक्षण आणि नागरी क्षेत्रातील नव्या गरजा पूर्ण करण्याचा भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांचा मानस आहे.

भारतीय नौदलासाठी कॅरिअर ऑन बोर्ड डिलिव्हरी (सीओडी) मोहिमा, लष्कर व हवाई दलासाठी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था आणि आपत्कालीन प्रसंगी इतर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ‘अल्ट्रा’च्या साहाय्याने पार पाडता येतील, असा विश्वास या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत ‘भारत फोर्ज’चे सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, ‘अल्ट्रा ड्रोन ही नौदल, हवाई दल आणि लष्कर या तिन्ही सैन्य दलांच्या गरजांसाठी उपयुक्त आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला तिन्ही सैन्य दलांना सेवा उपलब्ध करून देता येईल. नौदल मोहिमा, उंचावरील पुरवठा साखळी व दुहेरी उपयोगाचे तंत्रज्ञान यांना संरक्षण दलांकडून प्राधान्य देण्यात येत आहे.’

विंडरेसर्स अल्ट्रा ड्रोन

विंडरेसर्स अल्ट्रा ड्रोनमध्ये अत्याधुनिक मिशन कंट्रोल व ऑटोपायलट प्रणालीचा वापर करण्यात आला असून, सलग सहा ते सात तासांच्या दीर्घ मोहिमांसाठी त्याची रचना केलेली आहे. भारतात समुद्री व बेटांवरील प्रदेशांपासून हिमालयातील उंच डोंगराळ भागापर्यंत आणि ईशान्य भारतातील दुर्गम क्षेत्रांपर्यंत विविध वातावरणात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.