पिंपरी : पोलिसांनी बंद केलेला ध्वनिक्षेपक पुन्हा सुरू का केला, अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या होमगार्डच्या तोंडावर ठोसा मारून त्याचे दोन दात पाडले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना भोसरी येथील महात्मा फुलेनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.

सोहेल कादर शेख (१९, महात्मा फुलेनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर तुकाराम पाटील (२९, दिघी) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसोबा प्रतिष्ठाण मंडळाचा ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजात वाजत असल्याने तो बंद करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नीलेश तळेकर हे गेले होते. त्यांनी बंद केलेला ध्वनिक्षेपक मंडळाने पुन्हा मोठ्या आवाजात लावला. त्यामुळे होमगार्ड मयुर पाटील हे याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपी शेख याने फिर्यादी पाटील यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला. यात पाटील यांचे दोन दात तुटले आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने फसवणूक

घरबसल्या काम (वर्क फ्रॉम होम) देण्याच्या बहाण्याने एका तरुणीची एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ आणि १८ सप्टेंबर रोजी केशवनगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणीसोबत संपर्क करून त्यांना अर्धवेळ कामासाठी घरबसल्या काम देण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी एकूण एक लाख २० हजार ८०० रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना अटक

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. ही घटना ३० सप्टेंबर रोजी यमुनानगर येथे घडली.

ऋषिकेश सुनील संकपाळ (२६, निगडी), जाफर शामजान इराणी (४३, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यमुनानगर येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

देहू येथे पान टपरीवर कारवाई

देहू येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने एका टपरीवर कारवाई करत सात हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

विष्णू एकनाथ वाघ (५४, देहू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बागसिराज जावेद यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू याने त्याच्या पान टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत सात हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक

मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने मावळ तालुक्यातील आंबी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६.३९ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

संतोष अशोक कोरडे (३५, ताजे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सागर जैनक यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील आंबी येथे एकजण मेफेड्रोन विक्रीसाठी आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संतोष कोरडे याला कारसह ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख ६३ हजार ९०० रुपये किमतीचे १६.३९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

हिंजवडीत दोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

हिंजवडी परिसरातील एक्झरबीया गृहनिर्माण सोसायटीत पोलिसांनी कारवाई करून दोन जणांकडून दोन लाखांहून अधिक किमतीचा गांजा व एमडी जप्त केला आहे.

ऍडबीन अँथोनी फर्नाडीस (३०) आणि एल्वीस चिमान्सो ॲझोओरा (३४, दोघेही रा. एक्झरबीया सोसायटी, नेरे-दत्तवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार नरेश आनंद बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ३८० ग्रॅम गांजा व १७ ग्रॅम एमडी असा एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपी अमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगून होते. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.