पुणे : विविध प्रकारचे वन्यप्राणी, शिकारी पक्षी, माळरानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे पाहण्याची संधी सोलापूर येथील बोरामणी गवताळ सफारीच्या माध्यमातून निसर्गप्रेमींना अनुभवता येणार आहे. चादर, टाॅवेल या उत्पादनांसह शेंगदाणा चटणीमुळे प्रसिद्ध असलेल्या सोलापूरमध्ये जंगल सफरीचा आनंद नागरिकांना घेता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती आणि इंदापूर भागातील वनविभागाच्या माळरानांवर वन विभागाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या गवताळ सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सोलापूर वनविभागानेही हा कित्ता गिरवला आहे. विविध वन्यप्राणी पाहण्याचे आकर्षण उपलब्ध करून देणारे बोरामणी येथे गवताळ सफारी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

वाघ, बिबट्या हे वन्यप्राणी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असल्याचे सांगितले जात असले तरी माळरानांचे वैभव असलेले इतर वन्यप्राणीही बघण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळेच हा उपक्रम सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याच धर्तीवर बोरामणी येथील गवताळ सफारी सुरू झाली आहे, अशी माहिती पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

कोणते प्राणी पाहता येतील?

बोरामणी माळरानांवर लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट, नीलगाय, रानससा, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर, म्हसण्या मांजर आणि माळसरडा यांचा अधिवास आहे. तसेच सर्पमार गरुड, मॉन्टेक्यूचा भोवत्या, मोर, खंड्या, पिवळ्या गाठीची माळ टिटवी, सातभाई व्हल्ले, हरियालसह विविध प्रकारचे शिकारी पक्षी आणि माळरानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे बघायला मिळतील.

ऑनलाइन आरक्षणाची सोय

सफारीसाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. येथे रात्रीच्या निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटकांना रात्रभर मचाणावर थांबून वन्यप्राण्यांचे निरीक्षणही करता येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boramani grassland safari tourism center in solapur vvk 10 amy