पुणे : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १९ मोबाइल संच आणि दुचाकी असा तीन लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी बंडगार्डन, मार्केट यार्ड, वानवडी, कोंढवा, स्वारगेट भागात मोबाइल हिसकावण्याचे आठ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सोहेल बादशहा खान (वय २०), आयान झाकीर शाह (वय २१), फरहान वसीम शेख (वय २०, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी चौकात दुचाकीस्वार चोरटे खान, शाह, शेख यांनी एकाकडील मोबाइल संच हिसकावून नेला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड चोरट्यांचा माग काढत होते. त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. मोबाइल हिसकावणारे चोरटे काेंढव्यात वास्तव्यास असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान, शाह, शेख यांना ताब्यात घेतले.
चैाकशीत तिघांनी स्वारगेट, बंडगार्डन, कोंढवा, मार्केट यार्ड, वानवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल हिसकावण्याचे आठ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी मोबाइल हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीळकंठ जगताप, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बढे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे यांनी ही कामगिरी केली.