पुणे : दिवाळीनंतर शहरात घरफोड्यांचे सत्र कायम आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याच्या घटना घडल्या.लोहगाव भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, साेन्याचे दागिने असा एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमधील दादाची वस्ती भागात सद्गुरू सोसायटीत राहायला आहेत. दिवाळीनिमित्त तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. २६ ऑक्टोबर रोजी ते परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. पोलीस कर्मचारी एस. एल. जामदार तपास करत आहेत.
लोहगावमधील वडगाव शिंदे परिसरात असलेल्या एका घरातील कपाटातून ९५ हजारांची सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे तपास करत आहेत.
नांदेड सिटीत बांधकाम साहित्य चोरी
नांदेड सिटीच्या आवारात ठेवलेले तीन लाख १५ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नांदेड सिटी डेव्हपलमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनीत कर्मचारी आहेत. नांदेड सिटीच्या आवारातील बहार इमारतीच्या परिसरात ठेवलेले बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.
धायरीतील घरातून दागिने चोरी
सिंहगड रस्त्यावरील धायरी भागातील एका घरातून ५० हजारांचे साेन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धायरीतील वारांगणी मळा परिसरात राहायला आहेत. त्यांचे बैठे घर आहे. महिलेने डब्यात सोन्याचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी देवघरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक खरमाटे तपास करत आहेत.
कामगाराकडून एक लाखाचे वेलदोडे चोरी
मार्केट यार्ड भागातील भुसार बाजारातील एका दुकानात कामगाराने एक लाख रुपयाचे वेलदोडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याचे मार्केट यार्डातील भुसार बाजारात दुकान आहे. त्यांच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराने एक लाख रुपयांचे वेलदोडे चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक गडगडे तपास करत आहेत.
