पुणे : मासे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह साथीदारांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवम आंदेकरसह पाच ते सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा गणेश पेठेतील मासळी बाजार परिसरात मासळी विक्रीचा व्यवसाय आहे.

संबंधित स्टाॅल बेकायदा असल्याचा आरोप करुन शिवम आंदेकरसह साथीदारांनी व्यावसायिकाला दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे.

फरासखाना पोलिसांनी शिवम आंदेकरला ताब्यात घेतले असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.