पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना संग्रहालय आणि माहिती केंद्रासाठी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाद्वारे मान्यता आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सह्याद्री गिरिभ्रमण संस्थे’च्या शिष्टमंडळाला गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होते. त्याबाबतची माहिती ‘सह्याद्री’ चे अध्यक्ष राहुल जोशी यांनी दिली. या बैठकीला सह्याद्रीचे सचिव आणि सांस्कृतिक धोरण समितीच्या गड किल्ले आणि पुरातत्त्व वारसा उपसमितीचे सदस्य गणेश कोरे, सह्याद्रीचे कार्यकारिणी सदस्य प्रवीण फल्ले, सभासद गणेश पुरवंत उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘शिवनेरी संवर्धन आणि विकास आराखड्यामध्ये अंबरखाना संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्यात यावे, यासाठी आम्ही गेली अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. ही मागणी आणि पाठपुराव्यानुसार राज्य सरकारने अंबरखाना इमारत संवर्धनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीतून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्यावतीने अंबरखाना संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र, अंबरखान्याला अद्याप संग्रहालय आणि माहिती केंद्रासाठीची मंजूर केंद्र सरकारकडून मिळालेली नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेऊन, सविस्तर माहितीचे पत्र दिले.

केंद्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे ११ किल्ले युनेस्कोच्या नामांकनासाठी पाठविले आहे. त्याची प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत शिवनेरीचा समावेश होणार आहे. यामुळे शिवनेरी किल्ल्यावर संग्रहालय आणि माहिती केंद्राची आवश्यकता आहे. संग्रहालय आणि माहिती केंद्रासाठी मी आग्रही आहे. त्यासंदर्भातील सूचना मी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला दिल्या आहेत. याबाबतची मंजुरी आणि निधीची तरतूद केली जाईल, असे शेखावत यांनी सांगितल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री लवकरच शिवनेरीवर

‘सह्याद्री’च्या वतीने केंद्रीय मंत्री शेखावत यांना शिवनेरी भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी शिवनेरीवर येण्याचे शेखावत यांनी आश्वासन दिल्याचे राहुल जोशी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister gajendra singh shekhawat assure funds for heritage conservation including shivneri amberkhana museum pune print news apk 13 css