पिंपरी-चिंचवड: चिंचवड विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असला तरी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या विद्यमान आमदार आहेत. तर, त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे देखील चिंचवड मधून इच्छुक आहेत. या दोघांमध्ये चिंचवड विधानसभेवरून रस्सीखेच सुरू होती. परंतु, या रस्सीखेच मधून अश्विनी जगताप यांनी माघार घेतल्याची चर्चा मतदारसंघात आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये आहे. तसा दुजोरा नाव न घेण्याच्या अटीवर निकटवर्तीयांनी दिला आहे.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: सांगवीत पोलिसांनी जप्त केली पिस्तुल, जिवंत काडतुसे; शस्रे कोणाला विकली जात आहेत ? तपास सुरु…

चिंचवड विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभा असो की विधानसभा या मतदारसंघात भाजपला भरघोस मदत होत आलेली आहे. याच चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबातील कुठला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावरून दीर आणि भावजय मध्ये रस्सीखेच सुरू होती. काही दिवसांपूर्वीच दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा राजकीय वारसा मीच असल्याचं म्हणत चिंचवड विधानसभेवर त्यांनी दावा केला होता. तर दुसरीकडे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवडवर दावा करत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. दोघांमध्ये आरोप- प्रत्यारोप झाले होते. चिंचवड विधानसभेवर भाजपमधील शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते यांनीही दावा केलेला आहे. चिंचवड विधानसभेतून महायुतीचा उमेदवार हा भाजपचाच असणार आहे. याच दरम्यान जगताप कुटुंबातील उमेदवारीबाबत असलेला तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्यात उमेदवारीसाठी सामंजस्य झाले, असे बोलले जात असून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जगताप कुटुंबाच्या पॅचअपमुळे अश्विनी जगताप समर्थकांची मात्र मोठी अडचण झाली आहे.