पुणे: ‘राज्यात सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढाव्यात असा प्रयत्न आहे. मात्र, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राज्यातील महापालिकांचे आयुक्त, तसेच अ वर्ग नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांची परिषद यशदा येथे झाली. त्यानिमित्ताने पुण्यात आले असता, मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवडणूक वेळेत घेण्याबाबत कोणतीही अडचण सध्या दिसत नाही.
ज्या भागात पावसाची अडचण असेल, तेथे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार एकमेकांशी चर्चा करून काही दिवसांची वेळ घेईल.’‘तिन्ही पक्षांनी महायुतीत एकत्रच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांनीही सहा ते सात वर्षे तयारी केलेली असते. त्यांना दुखावून चालत नाही. अपवादात्मक परिस्थितीत स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल. निवडणुकीनंतर निवडून येतील ते पुन्हा एकत्रच येतील. याबाबत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चौकट‘एकमेकांवर टीका नको’‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. तेथे त्यांचे काम असते. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल. मात्र, हे करताना एकमेकांवर कोणतीही टीका केली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ज्या पक्षाचा उमेदवार तुल्यबळ असेल त्याचा विजय निश्चित आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकत्र येऊ,’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.