पुणे : पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत. या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी दिली. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यांनी नांदेड परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या जीबीएस रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर बोलताना पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नांदेड परिसरातील विहिरीतून पाणीपुरवठा होत असलेल्या भागात ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. विहिरीवर आच्छादन नसल्याने अथवा अन्य मार्गाने पाणी दूषित झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरीतील दूषित पाण्यामुळे जीवाणू आणि विषाणूसंसर्ग होऊन त्यातून जीबीएसचे रुग्ण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आमची प्राथमिकता रुग्णसंख्या वाढू न देण्यास आहे. रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी नियमावली

राज्यातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याची गरज आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नियमावली तयार केली जाणार आहे. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व यंत्रणांसाठी ही नियमावली आहे. यामुळे नागरिकांना भविष्यात दूषित पाणी मिळणार नाही आणि पर्यायाने त्यामुळे होणारे आजारही टाळता येतील, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जीबीएसचे रुग्ण राज्यात आधीपासून आढळतात. योग्य उपचारानंतर हे रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.- प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confession of health minister prakash abitkar guillain barre syndrome in pune due to contaminated well water in sinhagad road area pune print news stj 05 asj