पुणे : राज्यात अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त लागला नसताना दुसरीकडे ‘देव दिवाळी’चा मुहूर्त साधत वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) काम करणाऱ्या ठेकेदाराने भूमिपूजन केल्याचे सोमवारी जाहीर केले आहे. तसेच अधिकृत भूूमिपूजन ५ डिसेंबरनंतर होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, हे भूमिपूजन वर्तुळाकार रस्त्याचे नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे भूमिपूजन कोणत्या प्रकल्पाचे, कोणाच्या आदेशानुसार झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम मार्गावरील ९० टक्के भूसंपादन झाले आहे, तर पूर्व मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या महामंडळाने रस्त्याचे छोटे टप्पे करून निविदा प्रक्रिया राबवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रकल्पाचे काम मंदावले होते. आता आचारसंहिता संपल्यानंतर महामंडळाकडून कार्यवाही करून पूर्व मार्गावरील पुणे अहिल्यागर-पुणे साेलापूर महामार्गाला जोडणाऱ्या २४.५ कि. मी. लांबीच्या रस्त्याचे कंत्राट रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खाकी वर्दी’च असुरक्षित?

निवडणुकीपूर्वीच कार्यारंभ आदेश दिल्याचा आरोप

प्रकल्पासाठी महामंडळाने चार टप्पे करून निविदा मागविल्या होत्या. मात्र, पूर्वगणनपत्रकापेक्षा (एस्टिमेट) ४० ते ४५ टक्के जादा दराने निविदा आल्या होत्या. त्यामध्ये कथित निवडणूक रोखे घोटाळा प्रकरणातील दोन कंपन्यांसह चार कंपन्यांचाही समावेश आहे. महामंडळाने तडजोड करून वाढीव वीस ते पंचवीस टक्के जादा दराने मान्यता देत निवडणुकीपूर्वीच त्यांना कार्यारंभ आदेश दिला असल्याचा संघटनांकडून आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादाचा विषय ठरला असताना अचानक झालेल्या भूमिपूजनाने लक्ष वेधून घेतले आहे.

वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्वेकडील २४ .५ कि.मी. लांबीचे कंत्राट रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. ठेकादाराने स्वत:च्या कार्यालयाचे भूमिपूजन केले आहे. कामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री त्या ठिकाणी आणण्यात आली आहे. हे भूमिपूजन वर्तुळाकार प्रकल्पाचे नाही. – राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contractor working on ring road has announced on monday that he has performed bhumi pujan pune print news vvp 08 sud 02