पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्याक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदाही संगणक आणि संबंधित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम राहिल्याचे दिसून येत आहे. पण, त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूलभूत अभियांत्रिकी शाखांच्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला असून, या अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवांवर येणारे निर्बंध, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घटणाऱ्या रोजगारसंधी अशा घटकांचा परिणाम अभियांत्रिकी पदवी प्रवेशांवर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. यंदा प्रवेशासाठी २ लाख २ हजार ८८३ जागा उपलब्ध होत्या. प्रवेश १ लाख ६६ हजार ७४६ एवढे झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात वाढ आहे. संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा अशा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसत आहे. मात्र, त्याचबरोबर मूलभूत शाखांकडेही विद्यार्थ्यांचा कल असल्याचे आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवांवर निर्बंध आले आहेत. तसेच, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काम स्वयंचलित होत आहे, एआय एजंटचा वापर वाढतो आहे. त्यामुळे रोजगारसंधी कमी होत आहेत. मात्र, उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अशा क्षेत्रांत रोजगारसंधी वाढत आहेत. त्या आणखी वाढणार आहेत. ‘मागणी तसा पुरवठा’ या सूत्रानुसार विद्यार्थ्यांचा कल बदलतो आहे. – डॉ. शीतलकुमार रवंदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशन.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच अमेरिकेच्या धोरणांचाही परिणाम आहे. स्थापत्य, मेकॅनिकल, उत्पादन, इलेक्ट्रिकल अशा क्षेत्रांत चांगल्या मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. – डॉ. सुनील भिरुड, कुलगुरू, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ.

मूलभूत अभियांत्रिकीतील प्रवेशस्थिती

शाखा – वर्ष २०२४-२५ – वर्ष २०२५-२६

मेकॅनिकल अभियांत्रिकी – १६ हजार १२२ (६९.८८ टक्के,) – १७ हजार ११५ (७१.७३ टक्के)

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन – १७ हजार ३४३ (८७.०७ टक्के,) – १७ हजार ८७८ (८२.१६ टक्के)

स्थापत्य अभियांत्रिकी – १० हजार ७१९ (६४.६९ टक्के) – १२ हजार ४१५ (७१.०३ टक्के)

इलेक्ट्रिकल – ९ हजार ६३ जागांवर (७१.९७ टक्के) – ९ हजार ९१० (७२.५६ टक्के)