पिंपरी : महाराष्ट्रात ६० ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराइत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. या आरोपींकडून सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. धनंजय हरीष काळे ( वय २९, रा. गणेशनगर, पिंपळेगुरव), चंद्रकांत अनंता माने ( रा. अजंठानगर) आणि सुनिल मल्हारी तलवारे ( रा. काळेवाडी) अशी घरफोड्या करणाऱ्या टोळीतील अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी, प्राधिकरण परिसरात १६ नोव्हेंबर रोजी एक संशयित सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व हवालदार देवा राऊत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाणाच्या तयारीत असलेल्या धनंजय काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे गंठन, चैन आणि अंगठ्या असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत त्याने आणि त्याचे साथीदार चंद्रकांत माने आणि सुनील तलवारे यांनी मिळून पिंपळेगुरव येथील प्रभातनगर व निगडीतील भिमशक्तीनगर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. हे तिघेही सराइत गुन्हेगार असून त्यांनी पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि राज्यातील इतर ठिकाणी मिळून ६० घरफोड्या केल्या आहेत. आरोपी जास्त दिवस बंद असलेल्या घरांची रेकी करून घरफोड्या करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना किमती सोन्याचे दागिने, रोख रक्कम, इतर मौल्यवान वस्तुंबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, दिलीप चौधरी, शिवराम भोपे, देवा राऊत, दीपक तांदळे, विजय जानराव, केशव चेपटे, सोहेल चिखलकर यांच्या पथकाने केली आहे.
गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून तब्बल २८७० ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाइलसह महिलेला ताब्यात घेतले. ही कारवाई खंडोबा माळ, आकुर्डी येथे करण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी आकुर्डी येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिला बीएनएसएस कायदा ५ (३) प्रमाणे नोटीस बजावली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सदानंद रुद्राक्षे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एक लाख ४३ हजार ५०० रुपये किंमतीचा २८७० ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाइल मिळून आला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
मद्य तयार करणाऱ्या महिलेवर गुन्हा
बेकायदेशीर मद्य निर्मितीसाठी ठेवलेले तब्बल दोन हजार लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील सुदवडी या गावात ही कारवाई करण्यात आली.
हवेली तालुक्यातील देहू जवळील येलवाडी गावात राहणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अनंत रावण (४५) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने चार हजार लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकीत सुमारे दोन हजार लिटर गुळमिश्रीत रसायन साठवून हातभट्टीचे मद्य तयार करण्यासाठी वापरात ठेवले होते. छाप्यावेळी आरोपी महिला पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
