दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचौंग चक्रीवादळाची वाटचाल वायव्य दिशेने सुरू आहे. मिचौंग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कोणतीही वातावरणीय प्रणाली सक्रिय नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने सुरू आहे. मिचौंग चक्रीवादळ आपल्या सोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प घेऊन येत आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोलीसह विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारपर्यंत ढगाळ हवामानाची शक्यता आहे. शुक्रवारनंतर आकाश निरभ्र होईल. तसेच किमान तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी राज्यात कमाल ३० अंश सेल्सियस, तर किमान १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवले गेले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone michoung formed in the bay of bengal is moving north westwards pune print news dbj 20 amy