पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत सौरऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला आहे. ५१ किलो वॅट क्षमतेचा, दोनशे युनिट प्रतिदिन वीज निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पात १५१ सोलर पॅनेल असून, या प्रकल्पाच्या सौरविद्युत कार्यक्षेत्रात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व वर्ग, आवार, मैदान असा सर्व परिसर समाविष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. उपाध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, शाळेचे वित्त नियंत्रक डॉ. आशिष पुराणिक, प्रबंधक डॉ. सविता केळकर, सदस्य डॉ. शरद आगरखेडकर, शालासमिती अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे या वेळी उपस्थित होते. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रमणबाग प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुनील शिवले, रमणबाग शाळेचे परदेशस्थ माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी पालक, शिक्षक, संस्था यांच्यातर्फे या प्रकल्पाची उभारून कार्यान्वित करण्यात आला.

हेही वाचा… चाकणमधील वाहतूक कोंडी सुटणार, प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून सौरऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणारी रमणबाग शाळा राज्यातील पहिली अनुदानित मराठी माध्यमाची शाळा असल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक आणि भौतिक सुविधांची उभारणी काळाच्या पुढचा विचार करून उभारले जात असल्याचे शालाप्रमुख मनीषा मिनोचा यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deccan education societys new english school ramanbagh school has implemented a solar energy based power generation project in pune print news ccp 14 dvr