पुणे : महाविद्यालयांमधून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण अधिक कुशल आणि सक्षम बनवून २०४७ पर्यंत विकसित भारताच्या प्रगतीत कसा सहभाग नोंदवू शकतो, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (एनईपी) सिंहावलोकन करणे काळाची गरज आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट ॲडमिनीस्ट्रेशनतर्फे (सीईडीए) शनिवारी बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) येथील सायरस पूनावाला सभागृहात सायंकाळी आयोजित पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डाॅ. कुलकर्णी बोलत होते. सीईडीएचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे, सचिव धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. दीपक पौडेल उपस्थित होते. सीईडीएतर्फे देण्यात येणारा यंदाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागाच्या प्रमुख डाॅ. गारिकपती श्यामला यांना, तर कावेरी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘धोरणाची अंमलबजावणी करताना आलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला हे धोरण झेपेल का ? असे वाटत होते. मात्र, आता हे धोरण सुलभ झाले आहे. लवकरच पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार आहे, त्यावर काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत याबाबत मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात येणार आहेत.’

‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करताना शिक्षणाची आवड असणाऱ्यांबरोबर अभ्यासक्रमात कुशल आणि सक्षम बनविण्याच्या दृष्टीने बारकाईने विचार करण्यात आला आहे. त्यासाठी हे धोरण अस्तित्वात आणण्यासाठी प्राथमिक स्तरावर अनेक प्रयोग राबवले गेले. काही प्रयोग यशस्वी झाले, तर काही प्रयत्नांची पूनर्रचना करण्यात आली. मात्र, यातून मर्यादित विचार न करता पुढे जाण्याची दिशा प्रयोगांमधून निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना रुची असलेल्या विषयांचा समावेश करून छोटे-छोटे अभ्यासक्रम आखण्यात आले आहेत,’ असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

‘एकाच वेळी अनेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊन शिक्षण घेऊन बाहेर पडणे, या धोरणातील एका तरतुदीबाबत महाविद्यालयांकडून सकारात्मकता दर्शविण्यात येत नव्हती. मात्र, आता महाविद्यालयांना हे धोरण पटू लागले आहे. कला-वाणिज्य-विज्ञान याबरोबर अभियांत्रिकी शिक्षण देण्यास महाविद्यालये अनुकूल झाली आहेत. उद्योग, व्यवसायांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यता असल्याचे भविष्यकालीन आवश्यता लक्षात ठेवून प्रारूप विकसित करण्यासाठी महाविद्यालयांनी आणखी सक्षम होणे गरजेचे आहे, असेही डाॅ. कुलकर्णी म्हणाले.