पुणे : ‘डीजे’मुक्त मिरवणुकीचे आवाहन आणि पारंपरिक वाद्यपथकांवर कारवाई न करण्याबाबत पुणे पोलिसांच्या भूमिकेनंतर आता ढोलांच्या मागणीत घाऊक वाढ झाल्याचे चित्र आहे. यंदा ढोलपथकांकडून ढोलांच्या मागणीत सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ढोलांना इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे. परिणामी यंदाच्या गणेशोत्सवात ‘आव्वाज’ अधिकच घुमण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशा पथकांची पसंती मिळत आहे. त्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच दोन महिने आधी सुरू होणाऱ्या पथकांच्या सरावाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. तसेच विसर्जन मिरवणुकीतही ढोल-ताशा पथकांच्या दणदणाटामुळे ध्वनिपातळी शंभर डेसिबलपर्यंत जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा पारंपरिक वाद्यपथकांवर कारवाई केली जाणार नसल्याची भूमिका पुणे पोलिसांकडून काही दिवसांपूर्वीच मांडण्यात आली होती. तसेच यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचेही आवाहन सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.
या अनुषंगाने बाजारपेठेत आढावा घेतला असता, यंदा ढोलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती वाद्यविक्रेत्यांनी दिली. शुक्रवार पेठेतील ढोलविक्रेते संदेश लिगाडे म्हणाले, ‘अलीकडच्या काळात पारंपरिक वाद्यांकडे लोकांचा कल वाढतो आहे. डीजेमुळे होणारे ध्वनिप्रदूषण सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे मिरवणुकीत डीजेऐवजी पारंपरिक ढोल-ताशांच्या वापरासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून प्रयत्न होत आहेत. त्यास गणेशोत्सव मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
याचा परिणाम ढोलांच्या मागणीवर झाल्याचे दिसते. दर वर्षी सुमारे एक हजार ढोल विकले जातात. यंदा मात्र सुमारे दीड हजार ढोलांची विक्री पूर्ण झाली आहे. तसेच आणखी किमान पाचशे ढोल विकले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार दर वर्षी ढोलांची मागणी वाढते असे नाही. मात्र, करोनानंतरच्या काळात पारंपरिक वाद्यांकडे गणेश मंडळांचा कल वाढतो आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत ढोलांच्या मागणीत काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी यंदा झालेली वाढ ही गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे.’
‘यंदाच्या गणेशोत्सवात ‘डीजे’मुक्त मिरवणुकीचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे ढोल-ताशापथकांना गणेश मंडळांकडून पसंती दिली जात आहे. परिणामी ढोलांची विक्री वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणीत झालेली वाढ तीस टक्के अधिक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या एक-दोन वर्षात ढोलांची मागणी पाच टक्क्यांपर्यंत वाढत होती. विसर्जन मिरवणुकीपर्यंत ढोलांच्या विक्रीत आणखी वाढ होईल,’ असे ‘नाईक म्युझिकल्स’चे विजय नाईक यांनी सांगितले.
यंदा गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांची मागणी वाढली आहे. ढोल-ताशा पथकांच्या मागणीतही वाढ झालेली दिसते. ‘डीजे’मुक्त गणेशोत्सवासाठीही तयारी करण्यात येत आहे. मात्र, पारंपरिक वाद्यपथकांनीही आवाजाची मर्यादा पाळून उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा महासंघाकडूनही तयारी करण्यात येत आहे.- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ