पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील २५ दिवसांत १४ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, एकूण रुग्णसंख्या १६ झाली आहे. तर, मलेरियाचे २१ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू, मलेरियासारखे कीटकजन्य आजार रोखण्यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त घरांची तपासणी करण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले.
पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये जून महिन्यात दोघांना डेंग्यूची लागण झाली होती. जुलै महिन्यात आतापर्यंत २८ हजार ६१ तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या ४०३ संशयित रुग्णांपैकी १४ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर, मलेरियाचे सहा रुग्ण आढळले आहेत. मलेरियाच्या सकारात्मक रुग्णांची एकूण संख्या २१ वर पोहोचली आहे.
कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाच लाख ४३ हजार ७६६ घरे, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनर, एक हजार २३८ भंगार दुकाने, एक हजार ६०९ बांधकाम स्थळे अशा विविध ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यांपैकी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या तीन हजार ४३१ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या. ६२४ नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करीत २२ लाख २४ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
डासोत्पत्तीसाठी पोषक वातावरण
महापालिकेने पाच लाख ४३ हजार ७६६ घरांची तपासणी केली आहे. त्यांपैकी नऊ हजार ६८० घरांच्या परिसरात डासोत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. तर, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १० हजार ५४८ कंटेनरमध्ये डासोत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. एक हजार २३८ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. एक हजार ६०९ बांधकामस्थळांची तपासणी केली असता त्यांमध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
जलजन्य आजारांबाबत जनजागृती
कीटकजन्य व जलजन्य आजारांबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. नियमित औषधफवारणी, घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण, प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
डेंग्यू, मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषधफवारणी, तपासण्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे. परिसरात स्वच्छता राखावी. – सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.
शहरातील ज्या परिसरात डेंग्यूचा रुग्ण आढळत आहेत. त्या परिसरातील शंभर घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी पथके नेमली आहेत. स्वच्छ पाणी साचू नये याची काळजी घेतली जात आहे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.