पुणे : महसूल गुप्तचर विभागाकडून (डिरेक्टोरेट रेव्हेन्यू इंटलिजन्स) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला .याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ‘डीआरआय’च्या पथकाकडून मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बँकाॅकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (१२ मे) दोघे जण विमानतळावर उतरले. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा सापडला. चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली.

‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्यांचे अभिनंदन गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. असून, आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन केंद्रीय सीमाशुल्क (कस्ट), तसेच डीआरआयच्या पथकाने तस्करी करुन आणलेले अमली पदार्थ, तसेच सोने जप्त केले आहे. हायड्रोपोनिक गांजा रासायनिक प्रक्रिया करून तयार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत जास्त आहे.

सोसायटीत क्रिकेट खेळण्यावरून हाणामारी

पुणे: पाषाण भागातील एका सोसायटीत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पाषाण-सूस रस्त्यावरील पूर्वा हाइट्स सोसायटीत रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शाळकरी मुले क्रिकेट खेळत होती.

क्रिकेट खेळताना मुलांमध्ये वाद झाला. वादावादीचा प्रकार मुलांच्या पालकांना समजला. त्यानंतर मुलांचे पालक सोसायटीच्या आवारात आले. त्यांच्यात वाद सुरू झाला. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. एकाला बॅटने मारहाण करण्यात आली. मारहाणीत तो जखमी झाला. मारहाण, तसेच शिवीगाळ प्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.