पिंपरी-चिंचवड: लोणावळा नगर परिषदेबाबत महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आमदार सुनील शेळकेंच्या अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर माजी मंत्री बाळा भेगडे आणि माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाला त्यांनी विरोध दर्शविला आहे. लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करू नये असं आवाहन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना केलं आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेबाबत महायुतीचा फॉर्म्युला आहे, तो तेवढ्यापुरताच मर्यादित आहे. लोणावळा नगर परिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायतबाबत निर्णय झालेला नाही. तो केवळ तळेगाव दाभाडे नगर परिषदेबाबत शिक्कामोर्तब होता. लोणावळ्याबाबत स्थानिक भाजपा निर्णय घेईल, असे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी स्पष्ट सांगितले आहे. लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे, त्यांनी शेळकेंच्या फॉर्म्युल्याला विरोध केला आहे.
फॉर्म्युल्याबाबत आमचं एकमत नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शेळके यांनी आम्हाला सोडून सर्वाना बोलावाले. लोणावळ्यात ज्या बैठका झाल्या, त्या बैठकीला भाजपा पदाधिकाऱ्यांना बोलावले नाही. हे सर्व पाहता लोणावळ्यात महायुतीत काही आलबेल नाही. एकला चलो रेचा नारा देण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक भाजपा आमदार सुनील शेळके यांच्यावर नाराज आहे. मावळमध्ये महायुती तुटण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळकेंकडून स्थानिक नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे.
