पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी प्रसृत केले. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे आदेश १४ ते १७ जुलै या कालावधीसाठी प्रसृत करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिबंधात्मक क्षेत्रातील किल्ले, धबधबे, तलाव किंवा धरण या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात १४ ते १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहेत. त्यामध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी या ठिकाणी एकत्र येण्यास बंदी राहणार आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे किंवा पोहणे, धबधब्यावर जाणे किंवा प्रवाहाखाली बसणे याला बंदी आहे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे येथे सेल्फी काढणे किंवा चित्रीकरणाला मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी मद्यपान, मद्यवाहतूक, मद्यविक्रीला पायबंद घालण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी वाहन थांबवता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजवण्याला देखील बंदी घालण्यात आली आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तालुका प्रतिबंधात्मक क्षेत्र

हवेली सिंहगड किल्ला, अतकरवाडी ते सिंहगड ट्रेक

मावळ लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग, ड्युक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरेखिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक,

किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर

मुळशी अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड

भोर रायरेश्वर किल्ला

वेल्हा राजगड, तोरणा, पानशेत धरण परिसर, मढेघाट

जुन्नर किल्ले जीवधन

आंबेगाव बलिवरे ते पदरवाडी, भीमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट, गणपती मार्गे)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distric collector implement restrictions on gathering of people at these tourist and fort places in pune district pune print news asj