पुणे : राज्यातील लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध परीक्षांसाठी लेखनिक आणि इतर सोयी-सवलती पुरवण्याबाबतच्या सूचनांचे परीक्षांचे नियमन करणाऱ्या यंत्रणांकडून काटेकोर पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाने नव्याने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या असून, त्यानुसार दिव्यांग उमेदवाराने मागणी केल्यास लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक सुविधा देणे संबंधित परीक्षा यंत्रणेस अनिवार्य आहे. तसेच दिव्यांगांची परीक्षा तळमजल्यावर, परीक्षा केंद्रे दिव्यांगासाठी सुलभ आणि सुगम्य असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दिव्यांग कल्याण विभागाने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी या पूर्वी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या परिपत्रकातील सूचनांबाबत परीक्षांचे नियमन करणाऱ्या संस्थांकडून संदिग्धता निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबर २०२१ रोजीचे परिपत्रक अधिक्रमित करून सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

दिव्यांगत्व असलेल्या ज्या व्यक्तींना लिखाण करताना अडचणी येतात किंवा ज्यांची गती कमी असते त्यांना लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या इतर प्रकारातील दिव्यांग परीक्षार्थी शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रमाणित केलेले लेखनास शारीरिक मर्यादा आहेत, परीक्षा देण्यासाठी लेखनिकाची आवश्यकता आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची सुविधा करून घेण्यास पात्र राहतील. दिव्यांगत्व असलेल्या परीक्षार्थ्यास लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची निवड करण्याचे किंवा परीक्षा आयोजित करणाऱ्या यंत्रणेकडे मागणी करण्याचे स्वातंत्र्य असेल. परीक्षेच्या आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणा जिल्हा, विभागीय, राज्य स्तरावर लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांचे पॅनेल तयार करू शकेल. परीक्षा यंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिलेल्या लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची परीक्षेपूर्वी दोन दिवस आधी भेट घेण्याची मुभा देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची शैक्षणिक पात्रता परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा किमान एका टप्प्याने कमी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा किमान एका टप्प्याने कमी असावी. परीक्षा पारदर्शक होण्याच्या दृष्टीने परीक्षा कक्षात सीसीटीव्ही, दृश्य मुद्रण यंत्रणा बसवावी. आपत्कालीन परिस्थितीत लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक परीक्षेसाठी उपस्थित राहू न शकल्यास लेखनिक बदलण्याच्या प्रक्रियेत लवचिकता असावी. त्या दृष्टीने परीक्षा यंत्रणेने परीक्षा केंद्रावर राखीव लेखनिकांची व्यवस्था करावी. एका विषयासाठी एकच लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक वापरता येईल, अशा विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रमाणपत्र कोणाला बंधनकारक नाही?

अंधत्व, शारीरिक दिव्यांगत्व या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या परीक्षार्थींना त्यांची इच्छा असल्यास लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करण्यात आले आहे.