निवडणुकीची धामधूम संपली एकदाची.. गेल्या पंधरावीस दिवसांत उमेदवार तहानभूक हरपून नुसते धावत होते मतदारांच्या मागे! सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरा अंथरुणावर पाठ टेकेपर्यंत संपूर्ण दिवस गच्च कार्यक्रमांनी भरला होता – पदयात्रा, भेटीगाठी, मेळावे, सभा, बैठका असं सर्व काही. इतक्या व्यग्र दैनंदिनीनंतर उमेदवारांची मतदानानंतरची सकाळ कशी होती? आणि एकूणच दिवस कसा गेला? याची छोटीशी झलक..
दिलीप बराटे (राष्ट्रवादी काँग्रेस, खडकवासला मतदारसंघ) :
‘भाऊ, आज दिवसभराचं काय?’
मतदान बुधवारी संपलं. गुरुवारी सकाळी सकाळी प्रवीण शिंदे या कार्यकर्त्यांचा फोन आला – भाऊ, आज दिवसभराचं काय?
मला काहीच सुचेना.. आज काय करायचं? अगदी चुकल्या-चुकल्यासारखं झालं.
गेले पंधरा दिवस- रात्री दोन वाजता झोपणं आणि पहाटे पाच वाजता उठणं. पदयात्रा, लोकसंपर्क, रोज बारा-बारा तास चालणं. यात वेळ कसा गेला तेच समजलं नाही. तो निवडणुकीचा उत्साह म्हणायचा. कारण सवय नसतानाही इतका चाललो, तरी पाय दुखले नाहीत,
गुरुवारची सकाळ उजाडली. रीलॅक्स होती. गेले १५ दिवस कार्यकर्त्यांची भेट व्हायची, पण गप्पा झाल्याच नाहीत. सारखं निवडणूक, निवडणूक आणि निवडणूक! गुरुवारी कार्यकर्त्यांबरोबर निवांत चहा घेतला. वेगवेगळे किस्से ऐकले. माझा एक भगत नावाचा चाहता आहे. तो रोज मध्यरात्रीनंतर एक, दीड, दोन वाजता कधीही फोन करायचा आणि ‘भाऊ, तुम्ही जिंकलात’ असं सांगायचा. हे होतं माझा उत्साह वाढविण्यासाठी! त्याने सकाळी सर्वाना तो किस्सा सांगितला आणि सगळे खळखळून हसले. सगळा ताण हलका झाला. घरातील लोकांना वेळ देता आला. माझ्या चुलत भावाचा दीड वर्षांचा मुलगा आहे. गेल्या पंधरा दिवसांत त्याची भेटच झाली नव्हती. आज त्याच्याशी निवांत खेळता आलं.. आता पुन्हा रुटीन बसेल, हळूहळू!
………
माधुरी मिसाळ (भाजप, पर्वती मतदारसंघ)
मुलांनीच केली आईची सेवा
पदयात्रेला जाण्याची घाई नाही, की सभोवताली कार्यकर्त्यांचे कोंडाळे नाही. गेले १५ दिवस प्रचारानिमित्त घराबाहेर पडलेल्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासमवेत गुरुवारी केवळ कुटुंबातील सदस्य होते. ‘मम्मा, तू खूप दमली आहेस ना. काही काम न करता विश्रांती घे’, असे म्हणत आज मुलांनीच माझी सेवा केली. खरं तर, मी केवळ विश्रांती घेण्याचाच त्यांचा मानस होता. पण, कौटुंबिक परिवारातील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे बंगळुरूला जाण्यासाठी माधुरीताईंनी दुपारीच विमानतळाकडे कूच केले.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून जणू
मुलांशी मनसोक्त गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळले नाही. दमलेल्या मम्मीला ताजेतवाने वाटावे म्हणून त्याने खास माझ्यासाठी सूप बनविले. शेवयाची खीर केली होती. आठवडाभरातील सर्व वृत्तपत्रे वाचून काढण्यामध्ये वेळ गेला. कुटुंबातील सर्व सदस्यांसमवेत दुपारी दीड वाजता भोजन घेतले. थोडीशी विश्रांती घेऊन मी तातडीने कन्या तीर्था हिच्यासमवेत बंगळुरूला जाण्यासाठी विमानतळावर आले आहे, अशा शब्दांत माधुरीताईंनी दिनचर्या सांगितली.
…………………..
अभय छाजेड (काँग्रेस, पर्वती मतदारसंघ)
पदयात्रेनंतर आता ‘मॉर्निग वॉक’
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर पर्वती मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित झाली. पदयात्रेच्या माध्यमातून गेले १५ दिवस जे पायी चालणे झाले त्यामध्ये खंड पडू नये म्हणून पुन्हा एकदा रोजच्यासारखा ‘मॉर्निग वॉक’ सुरू केला. महाराष्ट्र मंडळाच्या मैदानावर नेहमीप्रमाणे चार फे ऱ्या मारून झाल्या तेव्हा कुठे बरे वाटले.. मतदान संपताच काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांची दिनचर्या गुरुवारी ‘मॉर्निग वॉक’पासून सुरू झाली.
तंदुरुस्तीसाठी दररोज किमान दोन
कुटुंबीयांसमवेत मी दुपारी भोजन घेतले आणि जणू सुट्टी असल्याप्रमाणे चक्क थोडा वेळ ताणून दिली. झोपेतून जागा आल्यानंतर चहा घेतला आणि घरच्या मंडळींसाठी थोडा वेळ दिला. पृथ्वीराज चव्हाण येणार असल्याचे समजल्याने ठीक पाच वाजता काँग्रेस भवन गाठले. तेथे कार्यकर्त्यांसमवेत शहरातील आठही मतदारसंघांतील मतदानाची चर्चा झाली. आता १९ तारखेच्या निकालाची उत्सुकता आहे, असे अभय छाजेड यांनी सांगितले.
……………..
चंद्रकांत मोकाटे (शिवसेना, कोथरूड मतदारसंघ)
चंदाभाऊ.. सकाळी साडेपाच..
मतदानाच्या दिवशी अखंड धावपळ झाली आणि बुधवारी रात्री झोपायला उशिरा झोपल्यानंतरही आमदार चंद्रकांत मोकाटे ऊर्फ चंदाभाऊ यांचा दिवस गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणेच साडेपाचला सुरू झाला. सकाळी उठण्याची त्यांची ही वेळ सहसा कधी चुकत नाही. तशी ती गुरुवारीही चुकली नाही. सकाळी उठल्यानंतरचा पहिला कार्यक्रम घरी येणाऱ्या वृत्तपत्रांचे वाचन हा असतो. त्याप्रमाणे आजही वाचन झाल्यानंतर ते सकाळी लवकरच घरातून बाहेर पडले. कोथरूड गावठाण आणि परिसरात तसेच जवळच्या उद्यानात
ही फेरी दुपापर्यंत चालली होती. अनेक कार्यकर्त्यांच्याही भेटी या वेळी झाल्या. घरी देखील कार्यकर्ते येत होते. हितचिंतकांचे फोन येत होते. दुपारी दीडच्या सुमारास घरी जेवण झाल्यानंतर विश्रांती झाली आणि नंतर ते पुन्हा बाहेर पडले. गेले अनेक दिवस पहाटेपासूनचा कार्यक्रम ठरलेला होता. सकाळी टेकडीवर वा उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठी आणि नंतर जाहीर प्रचार सुरू व्हायचा. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी पदयात्रा दुपारी एकपर्यंत चालायची. पुन्हा दुपारची पदयात्रा चार ते रात्री आठपर्यंत सुरू असायची. नंतर गाठीभेटी, बैठका असायच्या. ठरवलेला वा निश्चित केलेला असा काहीही कार्यक्रम आज मात्र नव्हता. त्यामुळे गडबड वा धावपळीशिवाय पार पडलेला हा दिवस होता आणि म्हणूनच तो खूप वेगळा ठरला.
……………
रमेश बागवे (काँग्रेस, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ)
दादांची धावपळ नाही, ताणही नाही..
पदयात्रेसाठी घरीच येऊन थांबणारे कार्यकर्ते, दिवसभराच्या नियोजनाची गडबड, प्रचाराची धावपळ, सभा.. अशी कोणतीही धावपळ गुरुवारी नव्हती. त्यामुळे रमेशदादा बागवे सकाळी पावणेआठच्या सुमारास उठले. मुख्य म्हणजे घरी कोणीही येऊन थांबलेले नव्हते. त्यामुळे कसलीही गडबड नव्हती. दादांची आई शांताबाई या चौऱ्याऐंशी वर्षांच्या आहेत. त्या मोठय़ा मुलीकडे वारजे येथे होत्या. सर्व आटोपल्यावर दादा आईच्या भेटीसाठी बाहेर पडले. आईने मतदानाची आवर्जूनच चौकशी केली आणि
तेथे कार्यकर्ते दादा यायची वाटच बघत होते. मग तिथे निवडणुकीची चर्चा रंगली. प्रत्येक जण, दादा मी असे केले, मी तसे केले, आमच्या भागात आपल्याला एवढे लीड.. असे अहमहमिकेने सांगत होते. चर्चा सुरू असतानाच कोणीतरी केक मागवले. मग चहा-केक झाल्यावर गप्पा मारून दादा लोहियानगरला घरी गेले. कितीतरी दिवसांनंतर त्यांनी घरी मनसोक्त टीव्ही बघितला. नातवंडांबरोबर खेळण्याचा आनंद घेतला. दुपारच्या जेवणानंतरही काही विशेष नियोजित कार्यक्रम नव्हता. त्यामुळे सगळे काही निवांत सुरू होते. सायंकाळी काशेवाडी येथील कार्यालयातही दादा थांबले होते. तेथेही कार्यकर्ते आणि हितचिंतक भेटीसाठी येत होते. गेले पंधरा दिवस सकाळी साडेनऊपासून दादांचा दिनक्रम सुरू व्हायचा आणि तो रात्री उशिरापर्यंत चालायचा. मतदान पार पडल्यानंतरचा गुरुवारचा दिवस मात्र अतिशय हलका आणि ताण नसलेला असा दादांना वाटला.
……………
गिरीश बापट (भाजप, कसबा मतदारसंघ)
भाऊंच्या निवांत गाठीभेटी
प्रचाराच्या काळात सकाळी साडेसहा ते मध्यरात्री दीडपर्यंत सतत व्यग्र राहिलेल्या आमदार गिरीशभाऊ बापट यांचा मतदानानंतरचा दिवस गुरुवारी सकाळी पावणेआठला सुरू झाला. नेहमीपेक्षा दोन तास उशिरा उठल्यानंतर कुटुंबीयांबरोबर चहा, नाश्ता झाला. नाश्त्यासाठी त्यांच्या आवडीचा भाजणीच्या थालपीठाचा बेत होता. नंतर गरम पाण्याची मनसोक्त अंघोळ हाही भाऊंच्या दिनक्रमातला आजचा एक महत्त्वाचा भाग ठरला. गेले अनेक दिवस सुरू असलेली धावपळ आता नव्हती. त्यामुळे सर्व
संपर्क यंत्रणा प्रभावी रीत्या राबवणाऱ्या बापट यांनी नंतर मोबाइलवरून संपर्क सुरू केला. गेले दहा-पंधरा दिवस जे कार्यकर्ते, पदाधिकारी अथक परिश्रम करत होते त्यांना धन्यवाद देण्यासाठी हे कॉल होते. घरातून पावणेअकराच्या सुमारास बाहेर पडून पुन्हा मतदारसंघातील काही जणांच्या घरी जाऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या. त्याही धन्यवाद देण्यासाठीच होत्या. वैद्य दादा खडीवाले आणि बापट यांचा खास स्नेह आहे. त्यामुळे दुपारी दादांची भेट आणि त्यांच्याकडेच भोजन असा बेत होता. दादांकडे दुपारच्या पंगतीचा लाभ भाऊ अनेकदा घेतात. जेवणानंतर पुन्हा गाठीभेटी आणि नंतर काही मित्रमंडळींच्या घरी जाऊन भाऊ निवांत गप्पा मारत बसले. कसबा पेठेतील मुख्य कार्यालयात सायंकाळी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. निवडणुकीच्या चर्चेशिवाय दुसरा विषय कार्यालयात नव्हता. मतदानाची प्रत्येक केंद्रातील आकडेवारी एकत्र झाल्यामुळे त्यावर चर्चा सुरू होती. कोणत्या उमेदवाराला कोणत्या भागात किती मते मिळतील याचेही अंदाज तेथे बांधले जात होते. एकुणातच भाऊंचा आजचा दिवस गाठीभेटींचाच; पण निवांत गाठीभेटींचा ठरला.
…………….
विनायक निम्हण (काँग्रेस, शिवाजीनगर मतदारसंघ)
दुपारची झोप अन् नातवंडांबरोबर खेळ!
प्रचाराच्या दरम्यान पदयात्रांसाठी रोजची पायपीट.. सातत्याने कार्यकर्त्यांचा गराडा.. धावत्या नियोजनाचा पाठलाग करण्यासाठी धावपळ अन् रोजच वेगवेगळे टेन्शन.. मागील पंधरा ते वीस दिवस ही स्थिती असताना आमदार विनायक निम्हण यांचा गुरुवारचा दिवस मात्र एकदम वेगळाच होता. प्रचाराच्या रणधुमाळीनंतर मतदान व त्यानंतर आलेल्या वेगळ्या व शांत दिवसाचा निम्हण यांनीही आनंद लुटला.
सकाळी लवकर उठणे, हे त्यांच्यासाठी नित्याचाचेच, पण गुरुवारचा दिवस वेगळाच होता. सकाळी उशिरापर्यंत
संध्याकाळी मित्रांसोबत फिरण्यासाठी ते बाहेर पडले. त्या वेळी राजकारण सोडून विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेतील विविध किस्से, गमती आदींनी हसत-खेळत त्यांचा हा दिवस गेला. निकालाच्या टेन्शनबाबत ते म्हणतात, ‘‘आता मतदान झालय, जे काही व्हायचे ते मतदानाच्या यंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे आता त्याची चर्चा कशाला करायची. त्यामुळेच मित्रांसमवेत सर्वसाधारण विषयांवरच चर्चा केली.’’