पुणे : पुण्यात गेल्या काही वर्षांत साथरोगांचा उद्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकताच पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकने महानगरीय सर्वेक्षण केंद्र (मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट) कार्यान्वित केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आगामी काळात संसर्गजन्य आजारांच्या साथीचे वेळेत निदान, प्रतिबंध आणि नियंत्रण यामध्ये मोठी मदत होणार आहे.

पुणे शहराचा साथरोगांचा इतिहास पाहता येथे सतत विविध आजारांचा उद्रेक होत असतो. शहरात २००९ मध्ये स्वाइन फ्लू, २०२० मध्ये करोना आणि २०२५ मध्ये जीबीएस अशा प्रकारचे उद्रेक झाले. या पार्श्वभूमीवर पर्यावरण व हवामान बदल, दूषित अन्न व पाणी, तसेच पशू-पक्षी यांच्या माध्यमातून उद्भवणारे विविध आजार व उद्रेक यांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळा सक्षमीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच जनजागृती यासाठी हे महानगरीय सर्वेक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची समन्वय बैठक घेण्यात आली.

महानगरीय सर्वेक्षण केंद्राच्य़ा कामकाजाची माहिती इतर विभागांनाही व्हावी, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. आगामी काळात काही साथरोग उद्भवल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीला भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारतीय हवामान विभाग, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, रेल्वे विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, जागतिक आरोग्य संघटना, राज्य कीटकजन्य आजार नियंत्रण विभाग, राज्य पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, राज्य सर्वेक्षण विभाग, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, पुणे इंडिअन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, महापालिकेचे पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, विद्युत, भवनरचना आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती केंद्राच्या प्रभारी व सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी हे केंद्र कार्यान्वित करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली. तसेच विविध साथरोगांचे पुणे शहरातील प्रभागानुसार मॅपिंग व विदा विश्लेषण करण्यात येणार असून, त्यामुळे साथरोग उद्रेक टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे अधोरेखित केले.

जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार डॉ. प्रदीप आवटे यांनी वन हेल्थ व संसर्गजन्य आजार यांचा परस्परसंबंध असल्याने आंतरविभागीय समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी या केंद्राच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. शहरातील आरोग्य सेवांना वैज्ञानिक व तांत्रिक बळकटी या केंद्रामुळे मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

महानगरीय सर्वेक्षण केंद्र हे शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या केंद्राच्या माध्यमातून वेळेवर माहिती संकलन, रोगांचे विश्लेषण आणि त्यावर आधारित त्वरित उपाययोजना राबविणे शक्य होईल. नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी ही एक प्रभावी यंत्रणा ठरेल. – नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.