पुणे : ‘अंतर्गत शत्रूंमुळेच देशात नक्षलवाद, साम्यवाद आणि डावे फोफावू शकले. डाव्यांनी अतिशय चातुर्याने कला, शिक्षण व पर्यायाने संस्कृतीवर वर्चस्व निर्माण केले. भारतीय सांस्कृतिक सभ्यतेला उद्ध्वस्त करणारा इस्लाम हा देशासमोरचा दुसरा मोठा शत्रू आहे. चीन, पाकिस्तानपेक्षा हे अमूर्त शत्रू अधिक धोकादायक आहेत,’ असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘पुणे संवाद’च्या वतीने आरोह वेलणकर यांनी ‘द २.५ फ्रंट वॉर : इंडियाज् सिक्युरिटी चॅलेंजेस अँड रोल ऑफ सिनेमा’ या विषयावर अग्निहोत्री यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘पुणे संवाद’चे मनोज पोचट, भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त अमित वशिष्ठ या वेळी उपस्थित होते.

अग्निहोत्री म्हणाले, ‘देशाला इथल्याच अंतर्गत शत्रूंपासून मोठा धोका आहे. त्यांच्यामुळेच देशाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांनी वेळोवेळी देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशातील विविधतेचा चुकीचा अर्थ काढून राजकीय अजेंडा पसरविण्याचे काम केले. अशा शत्रूंमुळेच या देशात उदारीकरणानंतरही नक्षलवाद, साम्यवाद मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. त्यांच्यामुळेच मुघल, इंग्रजांसारख्या परकीय सत्तांनी वर्षानुवर्षे इथल्या लोकांची पिळवणूक केली. डाव्यांनी अतिशय चातुर्याने इथल्या भूमीत साम्यवाद पेरला. तत्कालीन सरकारनेही त्यांना तशी संधी दिली. त्याद्वारेच त्यांनी शिक्षण आणि संस्कृतीवर वर्चस्व निर्माण केले.’

‘इस्लाम हा देशाचा दुसरा मोठा शत्रू आहे. भारतीय संस्कृतीविरुद्धच त्यांनी युद्ध पुकारले. भारताची सांस्कृतिक सभ्यता आणि शिक्षण व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न केला. इथली मंदिरे उद्ध्वस्त केली. परिणामी, या देशाचा सांस्कृतिक-सामाजिक वारसा, इथली स्थापत्यकला, शिल्पकला आणि सांस्कृतिक प्रतीके नष्ट करण्यात आली. ठिकठिकाणी जीवे मारण्याची भीती दाखवून स्थानिक लोकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले. इस्लामचा पर्याय समोर ठेवून इथल्या लोकांच्या आत्मिक प्रेरणा, त्यांचा आत्मविश्वास यावर हल्ला केला गेला,’ असे अग्निहोत्री म्हणाले.

‘भारत-पाक संघर्ष जितका अधिक तीव्र होतो आहे, तितकाच बांगलादेश बळकट होतो आहे. गेल्या काही वर्षांत बांगलादेश देशाचा नवा शत्रू म्हणून समोर येतो आहे. पूर्वेकडील सीमेवर देशाचा नवा शत्रू म्हणून बांगलादेशाचा उदय होतो आहे.’ असे मत त्यांनी व्यक्त केले. आदिती कुरणे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

पाकिस्तान आणि चीनसारख्या मूर्त शत्रूंपेक्षाही नक्षलवादी, डावे आणि इस्लाम हेच देशाचे मोठे शत्रू आहेत.- विवेक अग्निहोत्री, चित्रपट दिग्दर्शक