पुणे : मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधांमुळे (कफ सिरप) बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी मोहीम विभागाने आता हाती घेतली आहे. या मोहिमेत गुरुवारी पहिल्याच दिवशी पुणे विभागात २० औषध विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांची दुकाने (मेडिकल) बंद करण्यात आली.

औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री सर्रास होत असल्याचे चित्र आहे. आता मध्य प्रदेशात खोकल्याच्या औषधांमुळे बालकांचा मृत्यू झाल्याने यातील धोका समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांची तपासणी मोहीम गुरुवारपासून सुरू केली. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हे असून, या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून तपासणी करण्यात आली. खोकल्याच्या औषधांसह इतर औषधांचीही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचीही तपासणी करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणी मोहिमेत एकूण २२ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. यात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री करताना २० औषध विक्रेते आढळून आले. या विक्रेत्यांची औषध विक्री तातडीने थांबविण्यात आली आहे. या विक्रेत्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही औषधांची विक्री करता येणार नाही. याचबरोबर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. पुण्यातील सर्वाधिक १७ औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, सांगलीतील दोन आणि सोलापूरमधील एका औषध विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करताना एखाद्या औषध विक्रेता आढळल्यास त्याच्यावर थेट कारवाई केली जाते. त्याची औषध विक्री तातडीने थांबविण्यात येते. याचबरोबर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्यावर परवाना निलंबनाची कारवाई केली जाते. – गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. मात्र, ऑनलाइन मंचावरून कंपन्या थेट खोकल्याची औषधांची विक्री करीत आहेत. काही डॉक्टरही परवानगी नसताना औषधांचा साठा करून त्यांची विक्री करीत आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. – अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट