पिंपरी : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेचे दहशतवादविरोधी पथक आणि निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील अंकुश चौकात करण्यात आली. आरोपींपैकी तीन जणांनी गोवा येथून पारपत्र काढल्याचे समोर आले आहे. रॉकी सामोर बरूआ (वय २८), जयधन अमीरोन बरूआ (वय २८), अंकुर सुसेन बरूआ (वय २६), रातुल शील्फोन बरूआ (वय २८), राणा नंदन बरूआ (वय २५, सर्व रा. चित्तगोंग, बांगलादेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> रामवाडीपर्यंत मेट्रोला लवकरच हिरवा कंदील! केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम तपासणी पूर्ण

जिकू दास ऊर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे) हा फरार आहे. दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांनी बनावट जन्मदाखला आणि अन्य कागदपत्रांद्वारे आधारकार्ड तयार केले. त्यानंतर सर्वजण निगडी येथील साईनाथनगर येथील चाळीत राहत होते. या ठिकाणी त्यांनी आधारकार्डवरील पत्ते बदलून पुण्यातील पत्ते टाकले. बनावट कागदपत्रांद्वारे तीन आरोपींनी गोवा येथून पारपत्र काढून घेतले. अन्य दोन आरोपींचे पारपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाच आरोपींना अटक केली.