पुणे : ‘जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार व्यवस्था सध्या अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. अशा परिस्थितीत भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक घडामोडींचा फारसा परिणाम जाणवला नाही,’ असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी केले.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या ३१व्या पदवी प्रदान साेहळ्यात ‘इंडियन इकॉनाॅमी इन अ चेंजिंग ग्लोबल ऑर्डर’ या विषयावर दास बोलत होते. संस्थेचे कुलपती संजीव संन्याल, कुलगुरू प्रा. उमाकांत दाश उपस्थित होते.
‘जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाऱ्याला चालना देणाऱ्या व्यापार व्यवस्थेसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. करोनाकाळ आणि त्यानंतर युक्रेन-रशियातील संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. अशा परिस्थितीत स्वयंपूर्णता आणि धोरणात्मक स्वायत्तता या दोन बाबी प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेची प्राथमिकता ठरली आहे. संपूर्ण जग हे बाजारपेठ असावे, अशी धारणा होती. मात्र, सद्य:स्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले आाहे. जागतिक स्तरावरील व्यापार, उद्योगांनी अखंडित स्वरूपात व्यापार केला नाही. प्रत्येक देशात छोट्या स्तरावर व्यापार, उद्योग सुरू केला. त्यामुळे जागतिक बाजारपेठ ही एकसंध राहिली नाही,’ असे दास यांनी स्पष्ट केले.
‘भारतात आर्थिक पायाभूत सुविधा, व्यवस्था निर्माण झाली. गेल्या दशकात देशात रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या. सुजाण आणि व्यापक आर्थिक धोरणांमुळे भारताने जागतिक स्तरावरील अनेक बदलांना तोंड दिले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक बदलांना सामोरी गेली. देशांतर्गत मागणी आणि आर्थिक विवेकबुद्धीमुळे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढले. मुक्त व्यापार करार, सहा प्राधान्य करारांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सक्षम झाली. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरातीशी अलीकडे केलेले करार, हे याचे उत्तम उदाहरण आहे. आइसलँड, लिश्टेनस्टाइन, नाॅर्वे, स्वित्झर्लंड आणि भारताने २०२४ मध्ये सर्वसमावेशक भागीदारी करार केला आहे,’ याकडे दास यांनी लक्ष वेधले.
‘अमेरिका, युरोपियन युनियन, पेरू, ओमान, न्यूझीलंडसह अनेक देशांशी व्यापार करार झाला. या व्यापार कराराचा मुख्य उद्देश देश आणि नागरिकांच्या हिताला न्याय देणारा आहे. दीर्घकालीन कराराचे फायदे भारताला होणार आहेत. देशातील तरुणाई, देशातंर्गत मागणी, सक्षम पायाभूत सुविधा, जागतिक घडामोडींशी सुसंगत धोरणात्मक भूमिकेमुळे भारताच्या आर्थिक वाटचालीत सातत्य आहे,’ असे त्यांनी नमूद केले. संजीव संन्याल यांनी प्रास्ताविक केले. प्रा. उमाकांत दाश यांनी आभार मानले.
जागतिक मंदीचा फारसा परिणाम जाणविणार नाही. २०२५ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी निर्णायक ठरले आहे. सक्षम आर्थिक पायाभूत सुविधा आणि धोरणांच्या बळावर भारत जागतिक आव्हानांना सहजपणे सामोरा जाईल.- शक्तिकांत दास