पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) केलेल्या कारवाईत जामीन मिळाल्यानंतर येरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि साथीदारांनी फेरी काढून दहशत माजविली. पोलिसांनी याप्रकरणी कसबे याच्यासह ३५ ते ४० साथीदारांविरुद्ध गुन्हा केला. कसबे याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडले. येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढून त्यांना चोप दिला. पोलिसांनी चौकात तात्पुरता मंडप उभा करुन पडद्याआड नागरिकांच्या समक्ष त्यांना चोप दिल्याने पाेलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले. कसबे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जामीन मिळाल्यानंतर येरवडा कारागृहातून बाहेर पडलेला कसबे आणि साथीदारांनी मंगळवारी (७ जानेवारी) येरवड्याील लक्ष्मीनगर परिसरातून दुचाकीवरुन फेरी काढली. ‘येरवड्यातील भाई मीच’ अशी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करुन दहशत माजविली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिमत जाधव, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे ही वाचा… पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले

त्यानंतर पोलिसांनी कसबे आणि साथीदारांचा शोध सुरू केला. कसबे पोलिसांना सापडला नाही. गुरुवारी रात्री कसबेच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. येरवड्यातील लक्ष्मीनगर चौकात पोलिसांनी तात्पुरता मंडप टाकून त्याला पडदा लावला होता. पुणे विद्येचे माहेरघर, तात्पुरते पोलीस मदत केंद्र अशी पाटी तेथे लावली. कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी पकडून बंद पडद्याआड भरचौकात चोप दिला. त्यानंतर त्यांची धिंड काढली. लंगडत चालणाऱ्या कसबेच्या साथीदारांना चोप दिल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक नागरिकांनी केेले.

हे ही वाचा… मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन

याप्रकरणी कसबेसह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पोलीस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सोळुंके तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster who terrorized yerwada area arrested and procession by pune police pune print news rbk 25 asj