पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षा चालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून पसार होता. मात्र पुढील काही तासात आरोपी चालकाला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. तर या घटनेमध्ये रिक्षाचालक श्री. मरगळे हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. मरगळे यांच्या कुटुंबीयांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, तसेच पुणे पोलिसांकडे मागणी केली आहे.

या प्रकरणी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, वडगाव बुद्रुक येथे ३० सप्टेंबर रोजी भरधाव कारने एका रिक्षाला जोरात धडक दिल्याची घटना घडली. त्या घटनेमध्ये संबंधित रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्या चालकावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणातील आरोपी कार चालकाला काही तासात अटक करण्यात यश आले असून कार देखील जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही कार गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याने त्यांना देखील नोटीस बजविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार ने रिक्षाला धडक दिली. त्यावेळी कार मध्ये गौतमी पाटील होत्या का त्या प्रश्नावर ते म्हणाले, अपघातावेळी कारमध्ये गौतमी पाटील नव्हत्या, अशी माहिती तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले.