पुणे : ‘लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अमराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्याची जबाबदारी मराठी भाषा विभागाने घेतली आहे,’ अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला अतिरिक्त एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखा, मावळा फाउंडेशन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. सार्वजनिक बांधकाममंत्री, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष, विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत या वेळी उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

सामंत म्हणाले, ‘मराठी सातासमुद्रापार नेली पाहिजे. महात्मा गांधी लंडनमध्ये परिषदेसाठी गेले असताना त्यावेळी केळकर म्हणून त्यांचे स्वीय सहायक होते. त्या केळकर यांनी पहिले महाराष्ट्र मंडळ लंडनमध्ये स्थापन केले. त्याची वास्तू महाराष्ट्र मंडळाकडे होती. सरकारने थेट पहिल्यांदा लिलावात उतरून ती जागा घेतली. त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्या जागेत आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत हे केंद्र सुरू होईल.’

‘मराठी भाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मराठी प्रत्येकाला आली पाहिजे. मराठी येत नाही म्हणून कानाखाली मारणे योग्य नाही. अमराठी लोकांना मराठी शिकवण्याची जबाबदारी मराठी भाषा विभागाने घेतली आहे. दोन हजार दक्षिण, उत्तर भारतीयांनी ॲप्लिकेशन तयार करण्याची मागणी केली आहे. शासनाची अनुवाद समिती करण्यात येईल. त्यातून अन्य भाषांतील पुस्तके मराठीत आणता येतील. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांच्या एक लाख प्रती वितरित करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे,’ असे सामंत यांनी सांगितले.

‘वयाची शंभरी गाठलेल्या शि. द. फडणीस यांनी ९९ व्या संमेलनाचे बोधचिन्ह साकारणे हा दुर्मीळ योग आहे. सातारा येथील संमेलनाच्या निमित्ताने साताऱ्याला ३३ वर्षांनी संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला याचा आनंद आहे. संमेलनाचे काम सुरू झाले आहे,’ असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. तलवार आणि लेखणी महत्त्वाची असल्याचे बोधचिन्हातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे फडणीस यांनी नमूद केले.

रसिकांना संमेलनात आणण्याचे आव्हान

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता निधी मिळवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल. तसेच अभिजात भाषांच्या निधी वाटपातील असमानता मराठीच्या वाट्याला येणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. संमेलनापासून दूर गेलेले रसिक पुन्हा आणणे हे आव्हान आहे,’ असे मत डॉ. मिलिंद जोशी यांनी मांडले.

‘स्वागताध्यक्षपदाची संधी द्यावी’

‘मला पुढच्या वर्षी स्वागताध्यक्षपदाची संधी द्यावी. रत्नागिरीत अनेक साहित्यिक, कलाकार आहेत. राजकारणातही कलाकार आहेत. कलाकार तीन तास मेकअप करतात, आम्ही कायमच मेकअप करून असतो,’ अशी टिप्पणी सामंत यांनी केली.