पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरली जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात कक्षसेवकांची सर्वाधिक १६८ पदे असून, आया ३८, सेवक ३६, पहारेकरी २३, शिपाई २, क्ष-किरण सेवक १५, हमाल १३, रुग्णपटवाहक १०, सहायक स्वयंपाकी ९, नाभिक ८, स्वयंपाकी सेवक ८, प्रयोगशाळा सेवक ८, बटलर ४, दवाखाना सेवक ४, माळी ३, प्रयोगशाळा परिचर १, भांडार सेवक १, गॅस प्रकल्प चालक १ अशी पदे आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहेत. आयबीपीएस कंपनीकडे या भरती प्रक्रियेचे काम देण्यात आले आहे.
ससून रुग्णालयात अनेक वर्षांनी ही सरळसेवा भरती होत आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने अर्जांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे. या भरतीतील प्रत्येक संवर्गासाठी सामाजिक आरक्षण लागू आहे. ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेणी १५ ते ४७ हजार ६०० रुपये आहे.
विधानसभेतही चर्चा
रुग्णालयात अपुरे कर्मचारी असल्याने रुग्णांना स्ट्रेचरवरून त्यांचे नातेवाईकच नेत असल्याचे चित्र सातत्याने रुग्णालयात दिसते. रुग्णांना अनेक सेवा मिळण्यातही अडचणी येतात. ससूनमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ससूनमधील रिक्त पदे भरण्याची घोषणा त्या वेळी केली होती. आता प्रत्यक्ष भरती प्रक्रियेचे पाऊल पडले आहे. यामुळे ससूनमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
ससून रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. आयबीपीएस कंपनीकडून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. आतापर्यंत सुमारे ३० हजार उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत.- गोरोबा आवटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, ससून सर्वोपचार रुग्णालय
