Governor bhagat-singh-koshyari preparing to back to return said MLA Bharat Gogawle | Loksatta

‘राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत’; आमदार भरत गोगावले यांची माहिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

‘राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत’; आमदार भरत गोगावले यांची माहिती
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांसंदर्भात सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी दिली.

हेही वाचा- पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने करण्यात आली होती. अद्यापही राज्यपालांविरोधातील राजकीय पक्ष आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसेच सूचक संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आमदार भरत गोगावले यांनीही राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने नाना पेठेत जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर गोगावले यांनी पत्रकांरांना ही माहिती दिली.

हेही वाचा- ‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव

कुठल्याही पक्षाचा कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करू नयेत. शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. शिवाजी महाराज सगळ्यांचे दैवत आहेत. त्यांचा मान राखणे हे कर्तव्य आहे, अशी भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली आहे. त्यामुळे कितीही मोठा किंवा छोटा कार्यकर्ता असो, बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत आहेत, असे गोगावले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 21:56 IST
Next Story
पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ