पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने या मार्गावरील हडपसर ते यवत या दरम्यान सहा पदरी उन्नत मार्गांबरोबरच अस्तित्वातील रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे. ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर या रस्त्याची कामे होणार असून, त्यासाठी ५ हजार २६२.३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या संबंधीचा शासननिर्णय सार्वजनिक बांधकाम विग्गाच्या उपसचिवांनी नुकताच काढला.
हडपसर ते यवत हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. या दरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या असून, सातत्याने वाहनचालकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतमाल, औद्योगिक वस्तू आणि अन्य व्यावसायिकांसाठी हा मार्ग उपयुक्त असल्याने हडपसर ते यवत या दरम्याच्या रस्त्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे करण्यात येणार असून, मंत्रिमंडळानेही या कामांना मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी त्यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे.
‘टोल’चा बीओटी पर्याय
हडपसर ते यवत या दरम्यान टोलच्या बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन सहा पदरी उन्नत मार्गाचा वापर करणाऱ्यांकडून टोलवसुली करण्यात येणार असून, कार्यादेशानंतर (वर्क ऑर्डर) तीन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. अस्तित्वातील मार्ग सहा पदरी करताना त्यासाठीचे भूसंपादन आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) असणार आहे, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सहा पदरी उन्नत मार्ग आणि अस्तित्वातील रस्ता सहा पदरी करण्यात आल्यानंतर पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल, असा दावाही करण्यात आला आहे.