पुणे : संगमवाडी भागातून येरवडा येथे जाण्यासाठी महत्वाचा चौक असलेल्या बिंदूमाधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. या चौकात उड्डाणपुलासह ‘समतल विभाजक’ (ग्रेड सेप्रेटर) उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. या कामासाठी सुमारे ११६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

स्वागरेट, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, कोथरुड, स्वारगेट, शिवाजीनगर या शहराच्या पश्चिम आणि दक्षिण भागातून लोहगाव विमानतळ; तसेच आळंदी आणि अहिल्यानगरकडे जा-ये करण्यासाठी वाहनचालक पाटील इस्टेट येथून संगमवाडी रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याने येरवडा येथील बिंदूमाधव ठाकरे चौकाचा वापर केला जातो. या चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होते. खडकीहून येरवड्याकडे जाताना, तर संगमवाडी येथून येरवडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, विमानतळ, बंडगार्डन पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा येथे लागतात.

या चौकात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने बिंदूमाधव ठाकरे चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले आहे. याचा प्रकल्प आराखडा महापालिकेच्या प्रकल्प विभागाने तयार करून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या कामासाठी सुमारे ११६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. हा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ठरवीक रक्कम ठेवण्याची हमी देखील महापालिका प्रशासनाने घेतली असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

  • उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन मार्गिका
  • संगमवाडीवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे आणि बंडगार्डनकडे जाण्यासाठी ‘वाय’ आकाराचा ‘ग्रेड सेपरेटर’
  • उड्डाणपुलाची लांबी ९०० मीटर, तर रुंदी १५.६० मीटर
  • संगमवाडीहून डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरची लांबी ५५० मीटर
  • बंडगार्डनकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरची लांबी ४४० मीटर
  • संगमवाडी बाजूचा ग्रेड सेपरेटर ९ मीटर रुंद आणि तीन मार्गिकांचा असेल
  • प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी

बिंदूमाधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. – दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महापालिका.