पुणे : पावसाने रविवारी रात्रभर पुणे आणि परिसराला झोडपले. रविवारी दिवसभरानंतर रात्रभर पाऊस पडत होता. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, हवेली येथे १८० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला असून, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागासह घाटमाथ्यावरही पावसाचा जोर दिसून येत आहे.
उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाकडून येणाऱ्या कमी दाब क्षेत्राची वाटचाल उत्तर पश्चिमेकडे होत आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हवामान विभागाने पुण्याला रविवार, सोमवारी यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरी दिवसभर कायम होत्या. तसेच रात्रीही पावसाने झोडपून काढले. आज सोमवारी सकाळीही पावसाचा जोर कायम असल्याने विद्यार्थी, नोकरदारांची तारांबळ उडाली. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून आले.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भाग अशा सर्वच ठिकाणी पावसाचा जोर आहे. घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण जास्त आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शिवाजीनगर येथे सकाळी साडेआठपर्यंत ६० मिलिमीटर, लोहगाव येथे १०९ मिलिमीटर, तर चिंचवड येथे ८२.५ मिलिमीटर, पाषाण येथे ६१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच दौंड येथे ८२.५, हडपसर येथे ५६, बारामती येथे ५२, लवळे येथे ४५, तळेगाव येथे २८, तर घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे ५६, मुळशी येथे २० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.