पुणे : महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णयामुळे शहरातील शहरातील प्रभागांची संख्या एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे. तसेच ‘एक वाॅर्ड- एक नगरसेवक’ या प्रभाग पद्धतीऐवजी चार सदस्यांचा एक प्रभाग ही रचना सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. २०१४ पासून प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर महापालिकेत भाजपला सर्वाधिक ९८ जागा मिळाल्या असून, एक वाॅर्ड एक नगरसेवक या रचनेत महापालिकेत भाजपला आत्तापर्यंत कमाल पंचवीस जागा मिळवता आल्या आहेत.

मुंबई वगळता राज्यातील अन्य सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. लांबणीवर पडलेली महापालिकेची निवडणूक कधी होणार हा प्रश्न कायम असला तरी बहुसदस्यीय प्रभाग रचना भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव

वॉर्ड रचनेत भाजपला महापालिकेत आतापर्यंत सर्वाधिक २५, तर प्रभाग रचनेत ९९ जागा मिळाल्या आहेत. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला ६, ९, १४ अशा जागा मिळाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने वाॅर्ड रचना आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यामुळे भाजपला आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चार नगरसेवकांचा एक प्रभाग ही पद्धती भाजपसाठी अनुकूल ठरणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचनेबरोबरच प्रभागाच्या सीमा आणि परिक्षेत्रात येणाऱ्या लोकांची समाजवैशिष्ट्ये निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत असल्याने भजापला मतांचे ध्रुवीकरण करता येणे शक्य ठरत आहे. चार नगरसेवकांमुळे प्रभागाचा आकार वाढत असल्याने मतदारही वाढत असल्याने भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यताही वाढीस लागणार आहे.

हेही वाचा >>>कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत

नगसेवकांची संख्या वाढणार…

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे शहरातील प्रभागांची संख्या एक किंवा दोनने वाढेल, असा अंदाज आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १६४ नगरसेवक ४१ प्रभागातून निवडून आले होते. त्यातील ३९ प्रभाग हे चार नगरसेवकांचे, तर दोन प्रभाग तीन नगरसेवकांचे होते. महापालिका हद्दीत ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर या अकरा गावांसाठी एक प्रभाग करण्यात आला. त्यामुळे या प्रभागातून दोन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महापालिकेत ४२ प्रभाग आणि १६६ नगरसेवक होते. त्यानंतर अलीकडच्या काही वर्षात महापालिकेत पुन्हा २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांसाठी भौगोलिक क्षेत्र रचनेनुसार दोन प्रभाग होतील, असा प्रशासकीय अंदाज आहे. तसेच नगरसेवकांची संख्याही तीन ते चारने वाढणार आहे.