शिरूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने तयारी करण्यास सांगितले तर मी लढण्यास तयार आहे, असे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. शिरूर लोकसभा हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. परंतु, महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे आला आणि पक्षाने लढण्यास सांगितले तर मी शिरूर लोकसभा लढेल, असे महेश लांडगे यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे शिरूर लोकसभेवरून राष्ट्रवादीत तर्क वितर्क लावले जात आहेत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला असला तरी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे अद्यापही इच्छुक आहेत. तर भाजपाने शिवसेनेकडे असलेल्या शिरूर लोकसभेच्या मतदारसंघावर दावा केला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे आला आणि पक्षाने संधी दिली तर मी शिरूर लोकसभा लढेल, असं विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – अखेर ‘या’ पदांच्या भरतीला मुहूर्त, भरतीसाठी स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांना संधी मिळाली होती. परंतु, त्यांचा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. तेव्हादेखील आमदार महेश लांडगे हे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु, पक्षाने दिलेल्या आदेशापुढे महेश लांडगे यांनी माघार घेत महायुतीचे काम केलं. आता पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे हे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असून पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढेल असं म्हटलं आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ नेमका शिवसेनेकडे राहतो की भाजपाला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will contest in shirur lok sabha if the party orders says mla mahesh landge kjp 91 ssb