पुणे : पोलीस आयुक्तालयात ‘आयपीएस’ अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या तोतयाला पकडले. विशेष म्हणजे तोतयाने एका पोलीस उपायुक्तांसमोर आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी केली होती. चौकशीत त्याचे बिंग फुटल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली.
याप्रकरणी तोतया आयपीएस अधिकारी सागर वाघमोडे याला अटक करण्यात आली आहे. वाघमोडे नवी मुंबईतील नेरूळ परिसरात वास्तव्यास आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार घोरपडे पेठेत वास्तव्यास आहेत. या प्रकरणातील फिर्यादीचा तीन ते चार वर्षांपूर्वी वाघमोडे याच्याशी परिचय झाला होता. तक्रारदारांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्या वेळी वाघमोडे याने आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी केली होती. ३१ ऑक्टोबर रोजी वाघमोडे हा पुण्यात आला. व्यावसायिक आणि वाघमोडे यांची पुणे स्टेशन मेट्रो स्थानक परिसरात भेट झाली.
त्यानंतर वाघमोडे याने पुणे पोलीस दल, तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे व्यावसायिकाला सांगितले होते. वाघमोडे व्यावसायिकाला घेऊन महापालिकेत गेला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास वाघमोडे व्यावसायिकाबरोबर पुणे पोलीस आयुक्यालयात आला. पोलीस आयुक्यालयाच्या आवारातून एक पोलीस उपायुक्त निघाले होते. त्यावेळी वाघमोडे याने त्यांची भेट घेतली आणि आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी केली. पोलीस उपायुक्तांनी त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा ‘पुण्यातील एका परिमंडळातील पोलीस उपायुक्तांनी माझ्याबरोबर प्रशिक्षण घेतले आहे. ते माझ्या तुकडीत होते’, असे त्याने सांगितले. नेमके त्याच वेळी संबंधित पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्तालयात कामानिमित्त आले होते. पोलीस उपायुक्तांना थांबवून वाघमोडेबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा, वाघमोडे आयपीएस अधिकारी नसल्याचे उघड झाले. त्यानंतर या घटनेची माहिती बंडगार्डन पोलिसांना देण्यात आली. बंडगार्डन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
‘वाघमोडे हा तोतया आयापीएस अधिकारी असल्याचे सांगून वावरत होता. पोलीस आयु्क्तालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाघमाडे याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे’, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. वाघमोडे याने आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक केली आहे का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. वाघमोडेची पत्नी नवी मुंबईत सहायक पोलीस निरीक्षक असल्याची माहिती मिळाली आहे.
शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. ओैंध, सिंहगड रस्ता भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या.
