पिंपरी : आंतरजातीय विवाह केल्याने माहेरच्या लोकांनी महिलेच्या पतीला मारहाण करून महिलेचे अपहरण केल्याची घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक मांडवळा येथे रविवारी (३ ऑगस्ट) रोजी घडली. संबंधित दाम्पत्य उच्च शिक्षित असून, महिलेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या आई, भावासह १५ जणांवर अपहरण, मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याचा ५ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरजातीय विवाह झाला. विवाहाला महिलेच्या कुटुंबाचा विरोध होता. कुटुंबाने वर्षेभर तिला परत घरी आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तिची परत येण्याची तयारी नव्हती. रविवारी महिलेची आई, भाऊ, चुलत भाऊ हे तिघे १५ अनोळखी व्यक्तीसह दाम्पत्याच्या घरी गेले. इच्छा नसताना तिला घेऊन जाऊ लागले. पतीने विरोध केला असता तिच्या नातेवाईकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर तिला घेऊन गेले.
या घटनेतील महिलेची सुटका करण्यात आली आहे. तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. – संदीप गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण