लोणावळा : मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाघजाई मंदिराच्या खालील बाजूला असलेल्या खंडाळा बॅटरी हिल येथील वळणावर सोमवारी रात्री साडेदहा वाजता मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर उलटून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मोटारीवर पडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

या अपघातात दत्तात्रय रामदास चौधरी (वय ५५) व कविता दत्तात्रय चौधरी (वय ४६ वर्षे दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला असून भूमिका दत्तात्रय चौधरी (वय १६ वर्षे), मितांश दत्तात्रय चौधरी (वय ९ वर्ष, दोघेही रा. निमडाळे, जि. धुळे सध्या रा. देवकणपिंपरी, जि. जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (वय ४० वर्षे), जान्हवी योगेश चौधरी (वय ३१), दिपांशा योगेश चौधरी (वय ९) , जिगीशा योगेश चौधरी (वय दीड वर्षे चौघेही रा. संस्कृती बिल्डिंग राव कॉलनी तळेगाव, ता. मावळ) हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा : Pune Porsche crash : काँग्रेसकडून न्यायिक चौकशीची मागणी, आरोपीचा ‘तो’ VIDEO पोस्ट करत विचारले ५ महत्त्वाचे प्रश्न

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनर चालकाचा खंडाळा बॅटरी हिल येथील उतार आणि वळणार ताबा सुटला. कंटेनर पुण्याकडे निघालेल्या मोटारीवर उलटला पलटी झाला. अपघातात मोटार चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला. मोटारीतील सहाजण जखमी झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहयक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहेत.