पुणे: गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ, पावसाळी हवामान येत्या १७ मेपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. ढगाळ, पावसाळी हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून, यंदाच्या मे महिन्याचा पूर्वार्ध तापमानाच्या दृष्टीने सुसह्य ठरला आहे.

यंदा एप्रिलमध्ये महिनाभर तीव्र उष्मा सहन करावा लागला. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत राहिल्यामुळे दिवसा ऊन आणि रात्रीही उष्मा सहन करावा लागला. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे तापमानात वाढ होत होती. परिणामी, एप्रिलमध्ये शहर आणि परिसरात १३ ते १४ दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असण्याचा विक्रम नोंदवला गेला.

मात्र, ५ मेपासून शहरात ढगाळ आणि पावसाळी वातावरण तयार झाले आहे. शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यात पाऊसही पडला. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. हेच वातावरण १७ मेपर्यंत काम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परिणामी, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्याचा पूर्वार्ध उष्म्याच्या दृष्टीने सुसह्य ठरला आहे.

हवामान विभागाकडे असलेल्या नोंदींनुसार, मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान ७ मे १८८९ रोजी ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. गेल्या काही दिवसांतील तापमानाचा आढावा घेतला असता, शिवाजीनगर येथे कमाल तापमान सोमवारी ३६.४, रविवारी ३६.२, शनिवारी ३५.४, शुक्रवारी आणि गुरुवारी ३२.८ अंश सेल्सिअस असे राहिले आहे. येत्या १७ मेपर्यंत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या आणि उंच ढगांची निर्मिती होऊन ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती १७ मेपर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पूर्वार्धातील तापमान दिलासा देणारे आहे, असे म्हणता येईल. – एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग (आयएमडी)

गेल्या ५ दिवसांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

१२ मे : ३६.४

११ मे : ३६.२

१० मे : ३५.४

९ मे : ३२.८

८ मे : ३२.८